पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार झाल्याची घटना समोर आहे. आत्माराम उर्फ आत्म्या लाडक्या भवर (रा. देवीपाडा, ता. वाडा, जि. पालघर) असे खुल्या कारागृहातून पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत येरवडा कारागृहातील अधिकारी हेमंत पाटील यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पसार झालेल्या भवर या कैद्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आत्माराम भवर हा मूळचा पालघर जिल्ह्यातील देवीपाडा गावचा रहिवासी आहे. २००९ मध्ये आत्मारामने देवीपाडा गावात एका व्यक्तीचा खून केला होता. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात न्यायालायने त्याला जन्मठेप आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. दंड न भरल्यास ६ महिने कारवास भोगावे लागेल, अशी तरतूद न्यायालयाने आदेशात केली होती. दरम्यान, भवर हा येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.
भवर याची वर्तवणुक चांगली असल्यामुळे त्याची रवानगी कारागृह प्रशासनाने खुल्या कारागृहात केली होती. खुल्या कारागृहातील कैदी शेती करतात. शनिवारी दिवसभर भवर खुल्या कारागृहात होता. त्यानंतर कारागृहात रक्षक तौसिफ सय्यद यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कैद्यांची हजेरी घेतली. तेव्हा भवर उपस्थित नसल्याचे दिसून आले. कारागृहातील रक्षकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पसार झालेल्या भवरचा शोध घेण्यात येत आहे.