पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना आज १२ फेब्रुवारीला सकाळी घडली आहे. कैद्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. दरम्यान, घटनेबाबत कारागृह प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. मंगेश विठ्ठल भोर (३०, मुळ रा. हिवरे, ता. जुन्नर, जि. पुणे) असं आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. भोर हा ओतूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, येरवडा जेलमधील कैद्यांना नेहमीप्रमाणे सकाळी नाष्टा करण्यासाठी बाहेर सोडण्यात आले होते. यावेळी कारागृहाच्या आवारात असलेल्या ओैषध केंद्राच्या परिसरातील मोकळ्या जागेत मंगेशने टाॅवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.