पुणे : पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अप्पर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २२ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ४ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत.
या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा सोडायची अस्त्रे किंवा फेकायची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, भाले, तलवारी, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
सभ्यता तथा नितिमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे.
हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना आणि ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे. तसेच त्याबाबत परवानगी आहे, त्यांना लागू होणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.