पुणे : तुमच्या नावाने परदेशातून कुरिअर कंपनीने पाकीट पाठविले आहे. मुंबई विमानतळावर पाकीट जप्त केले आहे. पाकिटात पारपत्र, अमली पदार्थ, परदेशी चलन, लॅपटॉप सापडला असून, तुम्हाला त्वरीत चौकशीसाठी हजर व्हावे लागेल, अशी बतावणी करून बाणेर परिसरातील एका डॉक्टरची सायबर चोरट्यांनी तब्बल १ कोटी, १ लाख, ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
सायबर चोरीचे प्रकार वाढत असतानाच याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, भामट्यांकडून फसवणूक सुरूच आहे. पोलिसी कारवाईची भिती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. डॉक्टरच्या फसवणुकीनंतर या डॉक्टरांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला. तुमच्या नावाने परदेशातून कुरिअर कंपनीने पाकीट पाठविले आहे. मुंबई गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी त्वरीत चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल, अशी बतावणी चोरट्यांनी तक्रारदाराकडे केली. चोरट्यांनी त्यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर मुंबई पोलिसांचे बोधचिन्ह वापरले होते.
दरम्यान, चोरट्यांनी तुमच्या बँक खात्याची पडताळणी करायची असून, तातडीने खासगी बंकेतील रोकड सरकारी बँकेत जमा करावी लागेल, असे सांगितले. तक्रारदाराच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेऊन चोरट्यांनी खात्यातून कोट्यवधीची रक्कम लांबवली.