पुणे : मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे मोटारीतून अपहरण करुन तिचा विनयभंग करण्यात आला . या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटारचालक राजेखाँ करीम पठाण (वय ३६, रा. कोंढवा) याला अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेली होती. त्यावेळी पठाण हा मोटारीतून तेथे आला. त्याने एका मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. या ठिकाणी जोडप्यांना बंदी आहे, असे सांगून त्याने तरुणी आणि तिच्याबरोबर असलेल्या मित्राची मोबाइलवरुन छायाचित्रे काढली.
तरुणीला धमकावून त्याने तिला मोटारीत बसण्यास सांगितले. त्यानंतर मोटार कोंढव्यातील खडी मशीन चौकात नेली. तेथील एका गल्लीत मोटार थांबवून तरुणीचा विनयभंग केला. त्यानंतर तरुणीला खडी मशीन चौकात सोडून पठाण घटनास्थळावरून पसार झाला. या सर्व घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून पठाणला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शबाना शेख तपास करत आहेत.