पुणे : रिझर्व्ह बँक, इंडिया किंवा सेबीमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एकाची ४० लाखांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव पांडे (रा. न्यू फ्रेंड कॉलनी, नवी दिल्ली) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ दरम्यानच्या काळात घडली आहे.
आरोपी गौरव पांडे आणि फिर्यादी यांच्या मुलीची ओळख एका विवाह नोंदणी संकेतस्थळावरून झाली होती. आरोपीने तो इन्कम टॅक्स विभागात कमिशनर पदावर असल्याचे सांगितले. यानंतर पांडे याने फिर्यादी यांना आरबीआयमध्ये सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये २० ते २५ लाख गुंतवले तर २ कोटी रुपये मिळतील असे सांगितले. यानंतर फिर्यादी यांच्याकडून काही रक्कम घेतली. तसेच तुमच्या मुलीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा सेबीमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. विशेष म्हणजे आरोपी पांडेने फिर्यादी यांच्या मुलीला खोटे नियुक्तीपत्र दिले. यामुळे तिने चालू असलेला जॉब सोडला. या बदल्यात ४० लाख ८२ हजार ५५१ रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सावंत करत आहेत.
दरम्यान, आरोपी गौरव पांडेची फिर्यादी यांच्या मुलीशी विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळख झाली होती. आरोपी गौरव याने फिर्यादी यांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. याप्रकरणी आरोपी गौरव पांडेवर बंड गार्डन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.