पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात आधी मुलाच्या वडिलांना आणि आज मुलाच्या आजोबांना अटक करण्यात आली आहे. तसेच या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. दरम्यान, आजोबांनी या प्रकरणात त्यांच्या कुटुंबासाठी चालक म्हणून काम करणाऱ्यावर गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव टाकला होता, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
काय म्हणाले अमितेश कुमार?
अमितेश कुमार म्हणाले की, पोलिसांनी आज अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना अटक केली आहे. अल्पवयी मुलाचे आजोबा पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाचे वडील आहेत. अपघाताच्या वेळी पोर्श कार तू चालवत होता असे पोलिसांना सांग. त्यासाठी त्याला पैशांची ऑफर दिली होती. तसेच चालकाने गुन्हा अंगावर घ्यावा म्हणून त्याला डांबूनही ठेवले होते, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहे.
पुढे म्हणाले, अल्पवयीन मुलाच्या पोर्श धडक प्रकरणाची घटना घडली, तेव्हा तो मुलगाच कार चालवत होता. त्याने ते आमच्याकडे मान्यही केले आहे. तरीही ही घटना घडली तेव्हा मुलगा मागे बसला होता आणि ड्रायव्हर कार चालवत होता आणि त्याच्या हातून अपघात झाला हे भासवण्यात आले. चालक पोलीस स्टेशनला आला तेव्हा त्याने पहिल्या जबाबात तशीच कबुली दिली होती.
मात्र अल्पवयीन मुलगाच कार चालवत होता, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला. तरीही चालकाने त्याचे म्हणणे सोडले नव्हते, चालक सातत्याने हेच सांगत होता की अल्पवयीन मुलगा कारच्या मागच्या सीटवर बसला होता. हे असे सांगण्याचे कारण म्हणजे रात्री ११ च्या सुमारास या चालकाला सोडवून घेऊन गेले होते. त्याचा मोबाइल स्वतःकडे ठेवला आणि त्याला मुलाच्या आजोबांनी डांबून ठेवले. आम्ही सांगू त्याप्रमाणे जबाब द्यायचा असा दबाव टाकण्यात आला होता. अशी धक्कादायक माहिती अमितेश कुमार यांनी दिली.