पिंपरी-चिंचवड : अनेक कंपन्यांमध्ये कामगार कायद्यांचे सर्रास उल्लंघन केले जाते. कंपनी मालक कोणत्याही आदेशाला न जुमानता कामगारांची पिळवणूक करतात. कामगार कायदा व कामगारांची सुरक्षा धाब्यावर बसवून अनुचित काम करण्याचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. असाच एक प्रकार खेड तालुक्यातील आंबेठाण येथे वीआरएम मेटाझाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगाराच्या हातावर बेतला. कंपनीत काम करत असताना पर्यवेक्षकाने एका कामगाराला अधिकचे काम दिले. तसेच ते काम अति घाईत करून घेतले. हे काम करत असताना कामगाराचा हात मशीनमध्ये अडकून तुटला. ही घटना १६ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
दिनेश महादेव शर्मा (वय २९, रा. आंबेठाण, ता. खेड) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पर्यवेक्षक प्रफुल्ल राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनेश शर्मा हे काम करत असलेल्या कंपनीत आरोपी राठोड हा पर्यवेक्षक म्हणून काम करतो. राठोड याने दिनेश शर्मा यांना दिलेले टार्गेट त्यांनी पूर्ण केले. तरीही शर्मा यांना घरी जाण्यासाठी मोकळीक न देता त्यांना आणखी दोन तास काम करण्यास सांगितले. ते काम लवकर पूर्ण करण्यासाठी राठोड याने घाईगडबड केली. त्यावेळी शर्मा यांचा उजवा हात ते काम करत असलेल्या हायड्रोलिक प्रेस मशीनमध्ये अडकला. त्यामध्ये शर्मा यांचा हात तुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.