पुणे : शहरातील वाहतूककोंडी आणि त्यातून जाताना वाहनचालकांना येणाऱ्या अडचणींची दखल थेट देशाच्या राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांनी घेतली आहे. पुण्यातील रस्त्यांच्या कामावरून त्यांनी सचिवाकडून पुणे महानगरपालिकेला पत्र पाठविले होते. ते नुकतेच प्रशासनाला प्राप्त झाले आहे. शहरच्या चारही बाजूंना होणारा विस्तार आणि वाढत असलेली लोकसंख्या या तुलनेत वाहतुकीसाठी कमी पडणारे रस्ते यामुळे शहरातील अनेक भागात कायमच वाहतूक कोंडीचा त्रास हा संहन करावा लागत आहे.
धायरी भागातील नागरिकांना तर गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूककोंडीला आणि रस्त्याच्या कामामुळे कायमच अड्चणीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा, यासाठी तेथील नागरिकांनी याबाबत थेट राष्ट्रपतीशी संपर्क साधला होता. आपल्या भागातील अडचणीची माहिती त्यांनी टपाल कार्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रपती कळवली होती. गणेशोत्सव आणि दिवाळीमध्ये पुणेकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला होता.