युनूस तांबोळी
शिरूर : ग्रामीण लोकनाट्य तमाशा ही रांगडी कला आहे. दमल्या-भागल्यांच्या जिवाला घटकाभर मनोरंजन करून विसावणारी आहे. या कलेला गावातल्या पाटलाने आश्रय दिला आहे. अठरापगड जातीला आश्रय देणाऱ्या पाटलाचे विचित्र चित्र या समाजासमोर ठेवले गेले. ढोलकी तुणतुण्याचा तमाशा लोप पावत चालला आहे. त्यामुळे जुन्या तमाशा कलावंतांना सांभाळा, नव्यांना जवळ करा, लोकनाट्य तमाशा कलेची जपवणूक करा, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
बेल्हे (ता. जुन्नर) येथे त्रिपुरारी पौर्णिमा, श्री बेल्हेश्वर यात्रोत्सवानिमित्त व संगितरत्न दिवंगत दत्ता महाडिक पुणेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त साईकृपा चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने लोकनाट्य तमाशा व लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अतुल बेनके होते.
या वेळी लोकनाट्य तमाशा कलावंत भिमाजी आप्पा सांगवीकर यांना संगितरत्न दिवंगत दत्ता महाडिक पुणेकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी साईकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव जगताप, उपाध्यक्ष सदाशिव बोरचटे, पोलिस अधिक्षक महेश मिट्टेवाल, सावकार पिंगट, सूर्यकांत पाटील, राकेश डोळस, अनिल गुंजाळ, लावणी नृत्यांगणा विजया कदम, लावणी सम्राज्ञी राजश्री काळे, अखिल तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघूवीर खेडकर, पतसंस्थचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
या महोत्सवाचे हे अकरावे वर्षे होते. तीन दिवस चाललेल्या या तमाशा महोत्सवात नामवंत फडमालकांनी हजेरी लावून तमाशा कला सादर केली. साईकृपा चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष वसंतराव जगताप यांनी संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांची व इतर लोकप्रिय गाणी सादर केली. त्यांच्या या गायनाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.
या महोत्सवाला अखील भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे भोसले, चित्रपट अभिनेते माधव अभ्यंकर, अभिनेत्री प्रिया बेर्डे, पानिपत कांदबरीकार विश्वास पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे विभागप्रमुख गणेश चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
तमाशा कलावंतांना भरीव मदत देणार
कोरोना काळात तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी तमाशा पंढरी नारायणगाव येथे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार व माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या माध्यमातून भरीव मदत करण्यात आली. यापुढील काळात देखील तमाशा कला जोपासण्याचे काम कलाकरांनी करावे. त्यांना भरीव मदत मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे.
– अतुल बेनके, आमदार, जुन्नर तालुका
तमाशा जिवंत ठेवण्याची कलावंतांची जबाबदारी
लोककलावंत हा प्रेक्षकांच्या आश्रयावर जगत असतो. मनोरंजनाच्या माध्यमातून कलाकारांनी समाजजागृती करावी. लोकनाट्य तमाशा जिवंत ठेवण्याची जबाबदारी कलावंतांची आहे. त्यासाठी शासन दरबारी मदतीचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.
– प्रिया बेर्डे, अभिनेत्री