संतोष गायकवाड
Manoj Jarange Patil Sabha : वाघोली : खराडी ता.हवेली येथे पुणे नगर महामार्गालगत असणाऱ्या महालक्ष्मी लॉन्समध्ये सोमवार (ता.२०) रोजी सकाळी १० वाजता मराठा कुणबी आरक्षण मुद्द्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेची जय्यत तयारी येथे सुरू आहे.
एक लाखापेक्षा अधिक मराठा बांधवांच्या उपस्थितीचा अंदाज
या जाहीर सभेसाठी परिसरातून साधारणतः एक लाखापेक्षा अधिक सकल मराठा बांधव उपस्थित राहतील असा अंदाज येथील संयोजकांनी व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या तिसऱ्या दौऱ्याला सुरुवात केली असून त्यांच्या अनेक गावांमध्ये सभा सुरू आहेत. खराडी, चंदननगर,वाघोली इ. गावातील मराठा युवकांनी एकत्रित येऊन या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेला जिल्ह्यातून मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत.
जरांगे पाटलांचा आळंदी येथे मुक्काम
रविवार (ता.१९) नोव्हेंबर रोजी जरांगे पाटील हे आळंदी येथे मुक्कामी असणार असून तेथून ते श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घेऊन तुळापूर येथे येणार आहेत. तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी मानवंदना देऊन ते खराडी येथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेचे आयोजन केलेले सर्व कार्यकर्ते सभेच्या नियोजनासाठी या ठिकाणी तळ ठोकून आहेत.
पोलीसांचा बंदोबस्त
या सभेच्या ठिकाणाला पोलीस प्रशासन भेट देऊन आढावा घेत असून या ठिकाणच्या बंदोबस्ताची तयारी करत आहे. या सभेसाठी २० एकर मैदान तर पार्किंग साठी १५ एकर मैदान तयार केले आहे. येथील व्यासपीठ २० फुट उंच व १५ फुट लांब असुन महिला व पुरुष यांच्यासाठी वेगळी बैठक व्यवस्था असुन ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी बैठक व्यवस्था केली आहे. येणाऱ्या बांधवांसाठी पाण्याची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृह, मोठ्या स्क्रीन, साऊंड व्यवस्था व सीसीटीव्ही कॅमेरे अशी भरगच्च तयारी येथे आयोजकांनी केली आहे. या नियोजनासाठी शेकडो स्वयंसेवकांची नेमणूक केली आहे.