पुणे : पुणे शहरात आणि विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावर रिक्षाचालक प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारत असल्याचे प्रकार सतत घडत असतात. दरम्यान, रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी लुट थांबवावी, अशा तक्रारी रेल्वे प्रवाशांकडून केल्या जात आहेत. अखेर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची दखल घेत फसवणूक होऊ नये, यासाठी रेल्वे स्थानकावरील प्रीपेड बूथ लवकच सुरू केले जाणार असून मोबाईल उपयोजनाद्वारे देण्याचा प्रस्ताव आहे.
रेल्वे स्थानकावरील प्रीपेड रिक्षा बूथ कोरोना काळात सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ते बंद झाले. त्यानंतर काही रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून अवाजवी भाडे घेण्यास सुरुवात केली. याबाबत प्रवाशांकडून सतत तक्रारी करण्यात येत आहेत. अखेर ४ वर्षांनी प्रीपेड बूथ पुन्हा सुरू करण्याची पावले रेल्वे प्रशासनाने उचलली आहेत.
याबाबत मंगळवारी १८ जून रोजी प्रीपेड ऑटो रिक्षा थांबा योजना राबविण्याबाबत रेल्वे, वाहतूक पोलीस विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) अधिकारी आणि रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात नुकतीच बैठक झाली.
या बैठकीत पुणे शहरामध्ये पुणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी सुरू असलेली प्रीपेड ऑटोरिक्षा थांबा ही योजना पूर्ववत करण्याचे ठरविण्यात आले आहे. रिक्षा संघटनांनी याला सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. अनेक रिक्षाचालक बेकायदा पद्धतीने स्थानक परिसरातून प्रवासी वाहतूक करत असतात. अशा रिक्षा चालकांना आळा घालण्यासाठी प्रीपेड रिक्षा बूथ सुरू करावा, अशी मागणीही संघटनांनी केली आहे.
बेकायदा रिक्षाचालकांकडून प्रवाशांची होणारी लूट रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित केला. रिक्षा संघटनांनी मोबाईल उपयोजनाद्वारे ही सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला असून या उपयोजनाचे व्यवस्थापन रिक्षा संघटनाच करतील, अशीही भूमिका यावेळी मांडण्यात आली आहे.