पुणे : आज पुण्यातील शिवाजीनगर गावठाण येथील रोकडोबा मंदिरामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्वछता अभियानाला सुरुवात झाली आहे. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमाशी सवांद साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातील नागरिकांना मंदिर स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार २२ जानेवारीपर्यंत ‘हर मंदिर स्वच्छ अभियान’ हे सुरू राहणार आहे. हे अभियान देशव्यापी असून या अभियानाची सुरूवात आपल्या पुण्यामधून आज करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा हे शिंदे गटासोबत जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे पक्ष प्रवेशाकरिता लोक रांगा लावून उभे आहेत. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्राला हादरे देणारे पक्ष प्रवेश दिसतील, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.
ते पुढे बोलताना म्हणाले, इंडिया आघाडीला अद्याप संयोजक मिळत नाही. असं प्रश्न विचारला, यावेळी ते म्हणाले की, शरद पवार यांना माझे दोन प्रश्न आहेत. नेहमी काँग्रेस पक्षाने देशातील हिंदू समाजाचा अपमान केला.
अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात आले असून त्या न्यासामार्फत काँग्रेससह सर्व पक्षांना निमंत्रण दिले. पण त्या निमंत्रणावर काँग्रेस पक्षाने बहिष्कार टाकला. त्यामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडी अशी आहे की, हिंदू सनातन धर्माविरोधात भूमिका मांडणे. तसेच सत्तेत आल्यावर हिंदू धर्म संपवून टाकू, अशी भूमिका तामिळनाडू मधील नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी मांडली आहे.
त्यामुळे इंडिया आघाडी सोबत असलेले उद्धव ठाकरे यांना मत देणे म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवणार्यांना मत देण्यासारखे आहे. तर आता उद्धव ठाकरे यांनी कितीही हिंदुत्वाच्या बाता मारल्या, तरी काँग्रेसच्या आणि इटालियन शक्तिच्या पायावर उद्धव ठाकरे हे लोटांगण घालत आहेत, अशी टीका बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, आज जर बाळासाहेब ठाकरे असते, तर ते अयोध्येत राम मंदिराच्या सोहोळ्यासाठी गेले असते. पण उद्धव ठाकरे हे आज ती भूमिका घेत नसून इटालियन शक्ति समोर त्यांना झुकावे लागत असल्याचे सांगत पुन्हा एकदा बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.