Maratha Reservation: पुणे : मराठा समाजाने ओबीसीऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेतलं तर अधिक फायदा होईल, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे. सध्याच्या घडीला ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणापैकी 18 ते 19 टक्के वाटा कुणबी समाजाला मिळतो. त्यामुळे मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश झाल्यास आरक्षणाचा खुपच कमी वाटा मराठा समाजाला मिळेल, असं मत गायकवाड यांनी मांडले आहे. परंतु, सध्या आर्थिक निकषावर मिळणाऱ्या 10 टक्के आरक्षणापैकी मराठा समाजाच्या वाट्याला आठ ते साडेआठ टक्के आरक्षण येत असल्याचं दिसत आहे. आर्थिक असमानता ही आरक्षणाच्या मागण्याचं मूळ आहे, असं गायकवाड म्हणाले. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सरकारने आपल्या धोरणात बदल करण्याची गरज आहे, असंही प्रवीण गायकवाड म्हणाले.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. जरांगे यांच्या या मागणीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे राज्यातील ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. यावरून मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये वाद-प्रतिवाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर प्रवीण गायकवाड यांनी मराठा समुदायाने आर्थिकदृष्ट्या मागास घटकातून आरक्षण घेण्याची भूमिका मांडली आहे. (Maratha Reservation)
प्रवीण गायकवाड यांनी म्हटले की, मराठा समाजाला ओबीसीमधून तीन ते साडेतीन टक्के आरक्षण मिळेल. त्याउलट ईडब्ल्यूएस आरक्षणातून आरक्षण घेतल्यास 10 टक्क्यांपैकी 8 टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांनी मंडल आयोगाला आणि ओबीसी आरक्षणाला विरोध करत आर्थिक निकषावरील आरक्षणाची मागणी केली होती.