इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षातील निष्ठावंत नेते नाराज झाले होते. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना दिलेली उमेदवारी मागे घ्यावी, अन्यथा बंडखोरी अटळ असल्याचा इशारा देखील या निष्ठावतांनी ‘परिवर्तन’ मेळाव्याच्या माध्यमातून शरद पवार यांना दिला होता. मात्र, ही बंडखोरी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाला रोखता आली नसल्याचे पाहायला मिळत आहे. अखेर पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांनी बंडखोरी केली आहे.
येत्या 23 ऑक्टोबर रोजी प्रवीण माने हे आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे इंदापूरात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. प्रवीण माने यांच्या उमेदवारीचा दत्तात्रय भरणे यांना फायदा, तर हर्षवर्धन पाटील यांची वाट बिकट होण्याची शक्यता आहे.
इंदापूर तालुक्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आलेले प्रवीण माने दोन तीन दिवसातच पुन्हा महायुतीकडे गेले. त्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचारही केला. मात्र, निवडणूक संपताच पुन्हा प्रवीण माने शरद पवारांच्या पक्षात सामील झाले. लोकसभा निवडणुकीच्या काळातच बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे देखील शरद पवार गटात आले होते. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या सोबत इंदापूरचे बडे नेते भरत शहा यांना देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी आप्पासाहेब जगदाळे किंवा प्रवीण माने यापैकी कोणालाही उमेदवारी द्या, अशी मागणी करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडे विधानसभेसाठी पाच जणांनी उमेदवारी अर्ज केला होता. मात्र, याच काळात अचानक माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हातात घेतली. त्यामुळे इच्छुकांचे चेहरे पडले.
हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होताच संध्याकाळी आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने व भरत शहा यांनी बंडाचे निशाण फडकवले. एवढंच नाही तर पाच दिवसात त्यांनी मेळावा घेत शरद पवारांना इशारा दिला. मात्र, त्यानंतरही पक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता प्रवीण माने यांनी थेट अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, प्रवीण माने यांच्या उमेदवारीमुळे मराठा समाजाच्या मतांमध्ये विभाजन होऊन त्याचा फटका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना बसू शकतो. तर धनगर समाज आमदार दत्ता भरणे यांच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला आमदार भरणे यांचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माने यांची समजूत काढली जाणार का? हे देखील पाहणे महत्वाचे आहे. जर राष्ट्रवादी पक्ष प्रवीण माने यांची समजूत काढण्यात यशस्वी झाला, तर हर्षवर्धन पाटलांचा मार्ग सुकर होऊ शकतो, अन्यथा त्यांची वाट बिकट असणार हे नक्की.