-दीपक खिलारे
इंदापूर : माजी जि.प. सदस्य व सोनाई ग्रुपचे प्रविण माने यांनी शक्ति प्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नाराज झालेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापुरातील नेते प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी बंडाचं निशाण फडकावलं. यातील प्रवीण माने यांनी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करण्यापूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रवीण माने हे भावनिक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले. व्यासपीठावर असलेले त्यांचे वडील आणि सोनाई ग्रुपचे सर्वेसर्वा दशरथ माने आणि प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्यांच्या मातोश्री यांनाही यावेळी रडू कोसळलं.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेत बोलताना प्रवीण माने म्हणाले की, “आज सकाळी मी लवकर घरातून बाहेर पडलो आणि आमच्या कुलदैवतासह विविध देवांचे दर्शन घेण्यासाठी गेलो. घरातून बाहेर जाताना घरी कोणीही नव्हतं, पण मी जेव्हा दर्शन घेऊन घरी आलो तेव्हा माझी गाडीही गेटमधून आत जात नव्हती इतकी गर्दी जमली होती. लोकांचं हे प्रेम बघून माझ्या डोळ्यांत टचकन पाणी आलं,” असं प्रवीण माने यांनी म्हटलं. जाहीर सभेत हा प्रसंग सांगताना माने पुन्हा भावनिक झाले आणि हुंदका देऊन रडू लागले. त्यानंतर उपस्थित समर्थकांनी प्रवीण माने तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ… अशा घोषणा देत माने यांना आधार दिला. .
यावेळी प्रवीण माने म्हणाले, आपण यंदा कोणत्याही स्थितीत ही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. “11 तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर आम्ही विविध गावांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सर्वांनी एकमताने सांगितलं की, तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे. आपल्या समोर शरद पवारसाहेबांचा पक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचाही पक्ष आहे. त्यांच्याकडे मोठमोठे नेते आहेत, संघटना आहे, गावोगावी पुढारी आहेत. आपल्याकडे फक्त तुमच्यासारखी सामान्य जनता आहे. याच जनतेच्या ताकदीच्या जोरावर आपण निवडणूक लढवणार आहोत,” असं प्रवीण माने यांनी म्हटलं आहे.
इंदापूर तालुक्याचा 1995 सालचा इतिहास पाहा. इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे जेव्हा तिरंगी होते. जो अपक्ष उभा राहतो तेव्हा तो इंदापूर तालुक्यातून निवडून येतो हा इतिहास आहे. लोकांनी सांगितलं आहे, आता जर माघार घेतली तर तुमचा नंबर डिलीट करून टाकू. आपल्या सर्वांच्या साक्षीने आशीर्वादाने थोड्या वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहे. परिवर्तनाच्या लढाईत समोर बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे लक्षात ठेवा मी एकटा आमदार होणार नाही, असं प्रविण माने म्हणाले.
या वेळी प्रविण माने यांनी बाबीर बुवाचा गुलाल उचलुन उमेदवारी अर्ज भरत आहे. भरलेला अर्ज पाठीमागे घेणार नसल्याचे सांगितले. यावेळी बोलताना सोनाई उद्योग समुहाचे प्रमुख दशरथ माने म्हणाले, प्रविण आमदारकीला निवडुन येईल. आणि सरकार बनावायला त्याची गरज भासेल, असे सांगुन प्रविणला निवडुन देण्याचे आवाहन केले.
या वेळी ॲड. बापुसाहेब साबळे, आझाद मुलाणी, रामदास बनसुडे, पुंडलिक धुमाळ, विलास घोळवे, रविराज भाळे, विजया कोकाटे, नवनाथ माने, पप्पु फडतरे, शरद चितारे, राजेंद्र भोळे, तानाजी धोत्रे, बाबासो चवरे आदींनी मनोगते व्यक्त केली.