संदीप टूले
केडगाव : गेल्या काही दिवसांपासून केडगाव ग्रामपंचायतीची निवडणूक तालुकाभर चांगलीच गाजत होती. त्यात सरपंचपदाचा लागलेला धक्कादायक निकाल यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष उपसरपंच निवडणुकीकडे लागले होते. त्यामध्ये ‘पुणे प्राईम न्यूज’ने वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून, केडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रशांत शेळके विजयी झाले आहेत.
केडगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत झाली होती. त्यात कोणत्याच गटाला बहुमत मिळाले नसल्याने उपसरपंचपद तरी आपल्या गटाकडे राहावे यासाठी शर्थीचे प्रयत्न दोन्हीही गटाकडून झाले. यासाठी गुरुवारी (दि.२३) निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये कुल गटाकडून अपक्ष प्रशांत शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर थोरात गटाकडून कुसुम गजरमल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी एकूण १८ सदस्यांनी मतदान केले.
यामध्ये कुल गटाचे प्रशांत शेळके यांनी १० मते तर थोरात गटाच्या कुसुम गजरमल यांना ८ मते मिळाली. यामध्ये प्रशांत शेळके हे दोन मतांनी विजयी झाले. मागील वेळी सरपंचपद हातचे गेल्याने कुल गट नाराज झाला होता. पण उपसरपंच पद विरोधी गटात कसल्याही परिस्थितीमध्ये जाऊ द्यायचे नाही, असा चंगच बांधला गेला होता. यामुळे यातील काही सदस्यांचा एक गट आधीच अज्ञातस्थळी हलविण्यात आला होता. तर काही कार्यकर्ते विरोधी कारवायांवर लक्ष ठेऊन होते. यामध्ये त्यांना यश आले आहे आणि शेवटी कुल गटाने उपसरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात पडून घेतली अन् एकच जल्लोष करत गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.
यावेळी भीमा पाटसचे संचालक अप्पासाहेब हंडाळ, किरण देशमुख, धनंजय शेळके, सचिन शेळके, अशोक हंडाळ, महादेव शेळके, मनोज शेळके, राजेंद्र गायकवाड, महेश म्हेत्रे,शरद गायकवाड आदीसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कुल गट थोरात गटाला खिंडार पाडण्यात यशस्वी
गेल्या काही दिवसांपासून केडगावमधील कुल गटातील ज्येष्ठांनी व तरुणांनी एक रणनीति आखून थोरात गटाला खिंडीत पकडण्याचा पूर्ण डाव आखला होता. त्यात हे मुरब्बी राजकारणी यशस्वी झाले असून, या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी दाखूनही दिले. तसेच थोरात गटातील काही ‘बडे मासे’ही त्यांनी गळाला लावले असल्याची चर्चा आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये थोरात गटातील नेत्यांमध्ये एकी व नियोजन नसल्याचे पाहायला मिळाले.
उपसरपंचपदासाठी थोरात गटाला केडगाव विकास आघाडीची मदत
या निवडणुकीमध्ये थोरात गटाकडे फक्त ३ सदस्य होती. तर केडगाव विकास आघाडी ६ तर कुल गटाकडे ८ आणि अपक्ष १ असल्यामुळे थोरात गटाला केडगाव विकास आघाडीच्या ६ सदस्यांनी मतदान केले आणि त्यांचे संख्याबळ ८ वर गेले. तसेच त्यांचा एक सदस्य फुटल्यामुळे त्यांच्या उपसरपंचपद मिळवण्यावर विरजण पडले.
विरोधकांना जनतेनेच दिली मोठी चपराक
”आतापर्यंत केडगावचे राजकारण कधीच जाती-पातीवर कुणी केले नव्हते, नाही इथून पुढे कधी होणार. पण काही समाजकंटक विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. विरोधकांना या उपसरपंच निवडणुकीच्या निमित्ताने जनतेनेच मोठी चपराक दिली आहे”.
– किरण देशमुख, मा. संचालक, भीमा पाटस कारखाना