लोणी काळभोर: पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची समजली जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या प्रभारी सभापतीपदी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील प्रशांत दत्तात्रय काळभोर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. प्रशांत काळभोर यांची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गुलाल उधळून आणि फटाके वाजवून जल्लोष केला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव धोंडकर यांच्या आईचे दुखःद निधन झाल्यामुळे सभापती दिलीप काळभोर यांचे सह्यांचे अधिकार काढून घेण्यासाठीची तहकूब करण्यात बैठक आज (दि. ७) पार पडली आहे. या बैठकीत विद्यमान सभापती दिलीप काळभोर यांच्या सह्यांचे अधिकार काढत ते संचालक प्रशांत काळभोर यांना देण्यात आले आहेत. आज बैठकीत विद्यमान सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव बैठकीत मांडण्यात आला. त्यावर चर्चा झाली. शेवटी हा ठराव मतदानासाठी टाकल्यानंतर ठरावाच्या बाजूने दहा संचालकांनी मतदान केले. तर सहा संचालक तटस्थ राहिले. तर एक संचालक बैठकीसाठी उपस्थित नव्हते. याच बैठकीत प्रशांत काळभोर यांची प्रभारी सभापतीपदी निवड करण्यात आली.
दरम्यान पुणे कृषी बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर यांच्या सह्यांचे अधिकार काढण्यासाठी दहा संचालकांनी बाजार समितीच्या सचिवांकडे पत्राद्वारे मागणी केली होती. या संदर्भात बैठक बोलावण्याचा निर्णय बाजार समितीच्या सचिवांनी घ्यावा, असा आदेश पणन संचालक विकास रसाळ यांनी दिला होता. या निर्णयाविरोधात सभापती दिलीप काळभोर यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केले होते. न्यायालयाने पणन संचालकांचा निर्णय कायम ठेवत ते अपिल फेटाळून लावले होते.
त्यामुळे सभापती दिलीप काळभोर यांचा सह्यांचे अधिकार काढण्याबाबत बैठक बोलाविण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार सोमवारी संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु, बाजार समितीचे सचिव धोंडकर यांच्या आईचे दुखःद निधन झाल्याने बैठक तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर ही बैठक आज झाली.
पुणे बाजार समितीच्या उपसभापती सारीका हरगुडे, मनिषा हरपळे, प्रकाश जगताप, नितीन दांगट, प्रशांत काळभोर, दत्तात्रय पायगुडे, अनिरुद्ध भोसले, संतोष नांगरे, लक्ष्मण केसकर, शशिकांत गायकवाड या दहा संचालकांनी सह्यांचे अधिकार काढण्याची मागणी केली होती.