पुणे : पुण्यातील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली पक्ष कार्यालयाबाहेर काळया फिती बांधुन निषेध व्यक्त करण्यात आला होता. गली गली मे शोर है अजित पवार चोर है, जो नाही झाला काकाचा, तो नाही होणार जनतेचा, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. तसेच पक्ष कार्यालयाबाहेर असलेल्या कोनशिलेवरील अजित पवार यांचे नाव हातोडीने फोडण्यात आले होते.
या घटनेनंतर अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे यांनी प्रशांत जगताप यांना जाब विचारला, त्यामुळे काही काळ पक्ष कार्यालयाबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे पक्ष कार्यालय परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या सर्व घडामोडीनंतर दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत.
अशातच आज शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप कार्यकर्त्यांन घेऊन शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यासाठी शिवाजीनगर येथील निवासस्थानी गेले होते. त्यावेळी अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन झाल्यानंतर एक व्यक्ती मला घरी भेटण्यास आला.
ज्यांनी अजितदादांच्या नावाची पाटी फोडली आणि विरोधात घोषणाबाजी केली, त्या आंदोलनकर्त्यांवर हल्ला होऊ शकतो. याबाबत मला त्या व्यक्तीने माहिती दिली आहे. पण या सर्व मुलांनी केलेल्या कृत्याबद्दल माफी देखील मागितली आहे. ही सर्व मुले २५ ते २८ वयोगटातील आहे. या सर्वांच्या जिवाला काही होऊ नये. त्यामुळे या प्रकरणी दादांनी लक्ष घालावं आणि दादांनी मोठेपणा दाखवावा, असं शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांना सांगितलं