लोणी काळभोर : पुणे विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मिडीअम शाळेतील विद्यार्थी प्रशांत महादेव गोडसे याने १०२ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. प्रशांत गोडसे याने मिळविलेल्या यशाबद्दल त्याच्यावर लोणी काळभोरसह जिल्ह्यातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पुणे विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धा अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे बुधवारी (ता. २२) पार पडली. या स्पर्धेत विभागातील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत येथील प्रशांत गोडसे या विद्यार्थ्याने सहभाग घेतला होता. गोडसे याने १०२ किलो वजन उचलून विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात सुवर्णपदक पटकावले. गोडसे याला शाळेच्या क्रीडा शिक्षिका शाहीन शेख व जिम ट्रेनर गणेश नगीने यांचे बहुमुल्य मार्गदर्शन मिळाले.
प्रशांत हा विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. प्रशांतचे वडील महादेव गोडसे हे ट्रकचालक आहेत. तर आई गृहिणी असून, त्याचा मोठा भाऊ विकास हा शिक्षण घेत आहे. प्रशांतला लहानपणापासून खेळाची आवड आहे. भविष्यात काहीतरी करून दाखविण्याची त्याची जिद्द होती. त्यामुळेच प्रशांतने घरची परिस्थिती हलाखीची असूनसुद्धा खेळाकडे दुर्लक्ष केले नाही. जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रशांत खेळाचा सराव करीत राहिला. अखेर त्याला त्याच्या मेहनतीची पोचपावती मिळाली. विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश मिळवून त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
दरम्यान, सुवर्णपदक विजेता खेळाडू प्रशांत गोडसे व क्रीडा शिक्षिका शाहीन शेख या दोघांचा विद्यालयाच्या वतीने प्राचार्या पौर्णिमा शेवाळे यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलताना प्रशांत गोडसे म्हणाला की, वेटलिफ्टिंग स्पर्धेत मिळालेले यश हे आई-वडील व शिक्षकांनी केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे मिळाले आहे. सुवर्णपदक पटकावल्यामुळे खूप आनंद झाला आहे. नातेवाईक व मित्रमंडळी फोन करून शुभेच्छा देत आहेत. आता पुढील राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी तयारी करणार आहे.
प्रशांत गोडसे व क्रीडा शिक्षकांचे कौतुक
पुणे विभागीय वेटलिफ्टिंग प्रशांत गोडसे यांने १०२ किलो वजन उचलून प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकाविले आहे. त्यामुळे प्रशांत गोडसे व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शाहीन शेख यांच्यावर लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.