लोणी काळभोर (पुणे) “यशवंत”च्या मालकीची एक इंचही जमीनीची विक्री न करता कारखाना पुन्हा सुरू करणार असल्याची वल्गना माधव काळभोर करत आहेत. मात्र, दुसरीकडे बारा वर्षांपूर्वी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, तत्कालीन उपाध्यक्ष माधव काळभोर व अशोक काळभोर या त्रिकुटामुळेच कारखान्याच्या मालकीची तब्बल पंचवीस एकर जमिनीचा लिलाव झाला, ही वस्तुस्थिती आहे. तर दुसरीकडे संचालक मंडळाला अंधारात ठेऊन एक लाख साखर पोत्यांच्या ऐवजी साडेचार लाख पोत्याची विक्री केल्यानेच कारखाना डबघाईला गेला व बंद पडला ही वस्तुस्थिती सभासदानांही माहित आहे. “यशवंत”चा सभासद सुज्ञ असल्याने उद्याच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे वीसही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वास पॅनेल प्रमुख व बाजार समितीचे संचालक प्रकाश जगताप यांनी व्यक्त केला.
“यशवंत” बंद पडण्यास कारणीभूत असणारे माधव काळभोर व त्यांचे सहकारी कारखाना पुन्हा सुरू करणार असल्याची वल्गना करत असले तरी, माधव काळभोर व त्यांच्या समवेत असलेल्या मंडळींनी कारखान्याच्या मालकीच्या सर्व मालमत्तेची विक्री करायची व त्या पैशांतून नवा कारखाना काढायचा, अशी एक नियोजनबद्ध कल्पना आखली होती, असा आरोपही प्रकाश जगताप यांनी यावेळी केला. वरील सर्व घडामोंडींना माधव काळभोर व त्यांच्या समवेत असणारे काही प्रमुख संचालक कसे जबाबदार होते, या विषयीचा कारखान्याचे तत्कालन प्रशासक बी.जे. देशमुख यांचा व्हिडीओच पत्रकार परीषदेत प्रकाश जगताप यांनी समोर आणून एकच खळबळ उडवून दिली आहे.
“यशवंत”च्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या शनिवारी (ता. ९) होणार असून कारखान्याचा प्रचार रंगतदार अवस्थेत पोचला आहे. शेतकरी विकास आघाडीचे पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप यांनी मंगळवारी (ता. ०५) सोरतापवाडी येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब चौधरी, गोपाळ म्हस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, शशिकांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष संदीप गोते, चित्तरंजन गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण केसकर, जितेंद्र बडेकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रकाश जगताप यांनी माधव काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांवर वरील आरोप केले.
या वेळी बोलताना प्रकाश जगताप म्हणाले, माधव काळभोर व त्यांच्या समवेत असणारी मंडळी कारखाना कोणाच्या काळात व कोणामुळे बंद पडला? कारखाना कसा आडचणीत आणला? १ लाख साखर विक्रीच्या परवानगी घेऊन साडे चार लाख विक्री कोणी केली? या प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. वैयक्तिक भ्रष्टाचाराचे उत्तरे मात्र ही मंडळी देत आहेत. कारखाना बंद पडण्यापूर्वी ऊस पुरवठा कमी होऊन गाळप क्षमता कमी झाली होती. जुन्या यंत्र सामग्रीची देखभाल दुरुस्ती ही व्यवस्थित केलेली नव्हती. साखर उतारा ६ पर्यंत खाली आला होता. शेतकरी व कामगार यांना देण्यासाठी कारखान्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे सहकार खात्याने चौकशी करुन संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर प्रशासकांच्या हातात कारभार देण्यात आला. त्यामुळे कारखाना प्रशासकाने बंद पाडला नाही, तर तत्कालीन संचालक मंडळानेच कारखाना बंद पाडला आहे. यांच्या जिरवाजिरवीच्या राजकारणात एकमेकांच्या सह्यांचे आधिकार काढण्यात आले होते. त्यामुळे यांच्यामुळेच कारखाना बंद पडला आहे.
प्रकाश जगताप पुढे म्हणाले, संचालक मंडळात एक लाख साखर पोती विकण्याचा ठराव झालेला असताना प्रा. केडी. कांचन, तत्कालीन उपाध्यक्ष माधव काळभोर व अशोक काळभोर या त्रिकूटाने एकमेकांचे वैयक्तिक आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी साडेचार लाख पोती साखर ९५० रुपये प्रती क्विंटल दराने विकली. नंतर साखरेचा भाव वाढून प्रती क्विंटल २६०० रुपयांपर्यंत गेले होते. या व्यवहारात कारखान्याचे ६० कोटींचे नुकसान झाले. या नुकसानीला जबाबदार कोण? याचे उत्तर विरोधी पॅनेलचे प्रमुख का देत नाहीत.
कारखान्याच्या पंचवीस एकर जमिनीच्या लिलाव प्रक्रियेबद्दल माधव काळभोर यांच्यावर आरोप करताना प्रकाश जगताप म्हणाले, बॅंक ऑफ बडोदाच्या साडे नऊ कोटींच्या थकित कर्जापोटी वरील त्रिकूटासह काही संचालकांची मालमत्ता बॅकेकडे तारण होती. बँक कर्ज वसूली प्रकरणात ही तारण जमीन जमीन सुटावीसुटावी, यासाठी डीआरटी कोर्टात (ऋण वसुली प्राधिकरण) माधव काळभोर यांनी अशोक काळभोर व के. डी .कांचन यांच्यासह अन्य काही निर्णय प्रक्रियेतील संचालक घेऊन या रक्कमेच्या वसुलीसाठी आम्ही जबाबदार नसल्याचे प्रतिज्ञापत्रक दिले. या प्रतिज्ञामुळेच कारखान्याची २५ एकर जमीन कवडीमोल दरात एका खाजगी माणसाच्या घशात गेली. एवढेच नाही तर ही मंडळी कारखाना सुरू करणार असल्याचे म्हणत असली, तरी या मंडळींनी नवा कारखाना काढायचा आहे. त्यासाठी यशवंतची सर्व मालमत्ता विक्री करायची अशी एक नियोजनबद्ध कल्पना आखली होती. या सर्व घडामोंडींना हे सर्व प्रमुख संचालक कसे जबाबदार आहेत, अशा आशयाचा तत्कालीन कारखान्याचे प्रशासक बी.जे. देशमुख यांचा व्हिडीओच प्रसिध्द केला.
दरम्यान हवेली तालुका खरेदी-विक्री संघावरुनही प्रकाश जगताप यांनी माधव काळभोर यांच्यावर आरोपांची फैरी झाडल्या. याबाबत बोलताना जगताप म्हणाले, हवेली तालुका खरेदी विक्री संघाची १२००० स्क्वेअर फूट जागा होती. ती विकसित करताना त्यातील फक्त २००० स्क्वेअर फूटच जागा संघाला मिळाली. विकसनाचा रेशो किमान ६०:४० असतो. या व्यवहारात हा रेशो ९०:१० सुध्दा नाही. हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. या व्यवहारात तुम्हाला किती पैसे मिळाले, याचे उत्तर शेतकऱ्यांना द्या. हा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार आहे. मी कृषी उत्पन्न बाजार समितीवर पहिल्यांदा निवडून आलो, त्यावेळी मला ५० एकर शेती होती. मी ट्रॅक्टर, जेसीबी, ट्रकचा व्यवसाय करुन जमीन घेतली आहे. पुण्यातील तुमच्या शांताई हाॅटेलची जागा कशी मिळवली, हे मला माहीत आहे. त्याचे आत्मपरीक्षण करा. आमचे पॅनेल विजयी होणार आहे, हे लक्षात आल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे बिनबुडाचे आरोप करत असल्याचे यावेळी प्रकाश जगताप यांनी सांगितले.