राहुलकुमार अवचट
यवत : यवत (ता.दौंड) ग्रामपंचायतीच्या वतीने मकरसंक्रांति निमित्त गावातील सुवासिनींसह , जुन्या परंपरांना फाटा देत विधवा महिलांसाठी पालखी भवन येथे हळदीकुंकू व तिळगुळ वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सर्वात प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. मोबाईलच्या युगात सर्व स्तरातील महिलांनी एकत्र येऊन बौद्धिक व वैचारिक देवाण- घेवाण करण्यासाठी प्रोत्साहन देत कार्यक्रमास सुरूवात झाली. यावेळी गावातील महिलांबरोबरच समाजात प्रवाहापासून दूर असलेल्या विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान देऊन सन्मान करण्यात आला.
विधवा महिलांच्या आयुष्यात सामाजिक सन्मान निर्माण करून मानसिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने जुन्या परंपरेला फाटा देत सामाजिक बदलाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रेरणादायी उपक्रमाद्वारे यवत ग्रामपंचायत महिला सदस्यांनी एक नवा अध्याय सुरू केला आहे. यावेळी हळदी कुंकूसाठी उपस्थित असलेल्या विधवा महिला त्यांच्या सन्मानाने भारावून गेल्या होत्या.
दरम्यान, यवत ग्रामपंचायत महिला सदस्यांनी पुढाकार घेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील ५०० पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला. यावेळी संगीत खुर्ची स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या काजल साळुंके, आरती भुतेकर व अंजली शहा यांना बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्नेहल बोरावके, सारिका माने,ऊर्मिला दोरगे, गौरी काळे, यांनी सहकार्य केले. तर या कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत सदस्या मंगल खेडेकर, मनीषा रायकर, मंदाकिनी कुदळे, उज्वला शिवरकर, सुजाता कुदळे, लंका कोळपे, गौरी दोरगे, कोमल कदम, नंदा बिचकुले यांनी केले होते.
यावेळी माजी सरपंच रजिया तांबोळी, बायजाबाई पवार, काश्मीरा मेहता, कुमुदिनी अवचट यांसह महिला बचत गटांच्या अध्यक्ष, सचिव व सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यवत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी यासाठी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरकणी प्रतिष्ठान अध्यक्षा शीतल दोरगे यांनी केले तर क्रांती बेन शहा यांनी आभार मानले.