पुणे : पीएम किसान योजनेसाठी शासनाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. वारसा हक्क वगळता २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली असेल तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता पीएम किसानसाठी नाव नोंदणी करताना पती-पत्नी व मुलांचे आधार कार्डसोबत जोडावे लागणार असून कुटुंबातील एकालाच लाभ मिळणार आहे.
केंद्र सरकाने शेतकऱ्यांसाठी २०१९ साली पीएम किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला तीन हप्त्यांत सहा हजार रुपये दिले जात असून राज्य सरकारनेही ही योजना राबवली आहे. वर्षाला लाभार्थी शेतकऱ्याला तीन हप्त्यांत सहा हजार रूपये मिळत आहेत. या योजनेत शेतकरी म्हणून एकाच कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एका व्यक्तीला किंवा अठरा वर्षांवरील मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो.
सातबारा उताऱ्यावर २०१९ पूर्वीची नोंद असेल किंवा वारसा हक्काने नाव नोंद असेल तर या योजनेचा लाभ मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पती-पत्नी व मुलगा तसेच २०१९ नंतर जमीन नावावर झालेले किंवा माहेरवाशिणीकडून जमीन आपल्या नावावर असल्याचे दाखवून दोन्हींकडून लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे योजनेत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार असून या योजनेत नोंदणी करताना पती-पत्नी व मुलांचे आधारकार्ड सोबत जोडावे लागणार आहे.