-बापू मुळीक
सासवड : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आयोजित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) गृहप्रवेश व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 ची मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशन सोहळा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओडिसा (भुवनेश्वर) येथे 4 लाख घरकुल पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचा गृहप्रवेश कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्या धर्तीवर सासवड नगरपरिषद सभागृहात (दि. 17 सप्टेंबर) रोजी पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप व सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण व नगरपरिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी तसेच सासवड शहरातील लाभार्थी यांच्या उपस्थित गृहप्रवेश सोहळा पार पडला.
सदर कार्यक्रमामध्ये ज्या लाभार्थ्यांचे घरकुल पूर्ण झालेले आहे, अशा लाभार्थ्यांचे अभिनंदन केले व प्राथमिक स्वरूपात लाभार्थ्यांना गृहप्रवेश समारंभावेळी घरकुलाची चावी देवून घरकुलाचे अनावरण करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजने (शहरी) अंतर्गत सासवड नगरपरिषदेस डी.पी.आर. 1 ते 5 मंजूर असून त्यामध्ये 250 लाभार्थी मंजूर झाले. त्यापैकी 151 लाभार्थीचे घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधून पूर्ण झालेली आहे. उर्वरीत घरकुलांचे कामे प्रगतीपथावर असून लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत. एकूण रक्कम रूपये 384.60 लक्ष निधी लाभार्थ्यांना बांधकाम प्रगतीनुसार वाटप करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमावेळी आमदार संजय चंदुकाका जगताप यांनी, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत येणाऱ्या नवीन योजनेमध्ये सासवड नगरपरिषद अंतर्गतजास्तीत जास्त नागरीकांनी घरे बांधून सदर योजनेचा लाभा घ्यावा, असे आवाहन केले. डॉ. कैलास चव्हाण यांनी लाभार्थ्यांना योजनेची माहिती देवून मार्गदर्शन केले.
यावेळी सासवड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप, विजयराव वढणे, अजित जगताप, सुहास लांडगे, संदिप जगताप, मनोहर जगताप, संजय आण्णा जगताप, तसेच माजी नगरसेवक नंदुबापू जगताप, संदिप राऊत तसेच नगरपरिषदेचे नगर अभियंता जावेद मुल्ला, सहायक कार्यालय अधिक्षक उत्तम सुतार, आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण, प्रधानमंत्री आवास योजनेचे CLTC अभियंता मनोज जगताप व नगरपरिषदेचे कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.