लोणी काळभोर : ऐन दिवाळीच्या सणासुदीतच लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरात विजेच्या लपंडावाचा खेळखंडोबा सुरु आहे. मागील तीन दिवसांपासून रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे. त्यामुळे महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी, सिद्राम मळा व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन, संभाजी नगर, घोरपडे वस्ती व कवडीपाट परिसरात दिवसातून 5 ते 7 वेळा वीज जात आहे. त्यामुळे नागरिकांना तासनतास अंधारात बसावे लागत आहे. तर काही भागात नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
पूर्व हवेलीत मोठ्या प्रमाणावर विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विजेचा दाब कमी-जास्त होत असल्याने कित्येक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे नादुरूस्त होत आहेत. दैनंदिन जीवनशैलीवर याचा परिणाम होत आहे. कदमवाकवस्ती व लोणी काळभोर परिसरात रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या नागरिकांच्या पाचवीलाच पुजली आहे. या भागात डासांचा प्रादूर्भाव असल्याने रात्रीची झोप उडाली आहे. दैनंदिन दिनचर्येवर याचा परिमाण झाला आहे.
दरम्यान, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्येक गुरुवारी पूर्व हवेलीतील विद्युत पुरवठा खंडित केला जातो. तरी देखील अनियमित वीजपुरवठ्यामुळे अनेकांना विजेच्या उपकरणांचा आधार घ्यावा लागत आहे. तर वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन देखील भरमसाठ देयके येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.
विद्युत उपकरणे नादुरूस्त
सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे नादुरूस्त होत आहेत. त्याशिवाय फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न, भाज्या, दूध खराब होत असल्याने आर्थिक नुकसानही होत आहे. पंखा बंद झाल्यावर लहान मुलाला डासांपासून वाचविण्यासाठी कपड्याने हवा घालावी लागत आहे. आणि लाईट येण्याची वाट पहावी लागत आहे.
– पल्लवी गायकवाड, लोणी स्टेशन, ता. हवेली