लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते कवडीपाट टोलनाका यादरम्यानच्या पाच किलोमीटर अंतराचे सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, या रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. रस्ता अत्यंत खराब झाल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.
हडपसर ते कवडीपाटपर्यंतचा रस्ता तयार करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून आठ दिवसापूर्वीचं या रस्त्याचे काम झाले आहे. मात्र, ठेकेदाराने निकृष्ट आणि अशास्त्रीय पध्दतीने हे काम केले आहे. काम सुरू असतानाच पाठीमागे डांबरीकरण उखडले जात असल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांडून शंका व्यक्त केली जात आहे.
हडपसर ते उरुळी कांचन रस्त्यावर छोटेमोठे खड्डे
दरम्यान, हडपसर ते उरुळी कांचन या रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून ठिकठिकाणी छोटेमोठे खड्डे पडले आहेत. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या वाहनचालकांना आगोदरच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहेत. त्यातच आता रस्त्यावरील खड्यांनी वाहनचालक त्रस्त झाले असून लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावरील वाहतूक पाहता रस्त्याची तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
दरम्यान, या रस्त्यावर जड वाहनांची नेहमीच वर्दळ असल्याने रस्त्यावरील डांबर उखडून खड्डे निर्माण होत आहेत. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्यावर सतत खड्डे पडतात. त्यामुळे प्रवासी वाहने, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दुचाकी, चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका
या महामार्गावर सतत अपघात होत असल्याने, काही नागरिकांना अपंगत्व तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे या रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम वेळोवेळी करण्यात येते, मात्र रस्ते पुन्हा नादुरुस्त होतात. त्यामुळे या रस्त्यावरील नेमका कोणता खड्डा चुकवायचा हेच वाहनचालकांना समजत नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांना अपघाताचा नेहमीच धोका असतो.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे दुर्लक्ष
आठ दिवसाच्या आतच महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडत असतील, तर हे काम किती दर्जाचे झाले? हे आपल्याला दिसून येते. तसेच एनएचआय संबंधित ठेकेदारावर कारवाई का करीत नाही, असा सवाल उपस्थित करत एनएचआयने या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
कारवाईची मागणी
हडपसर ते कवडीपाट या दरम्यानच्या रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई करावी. तसेच जो पर्यंत रस्ता सुस्थितीत येत नाही. तोपर्यंत त्याचे बिलही काढू नये. अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
हडपसरहून लोणी काळभोरला दुचाकीवरून येत असताना शेवाळवाडी चौकाजवळ अचानक खड्डा आल्याने गाडी जोरदार खड्ड्यात आदळली. त्यामुळे गाडीवरील माझे नियंत्रण सुटले. त्याचवेळी पाठीमागून मोठा टेम्पो येत होता. मात्र सुदैवाने मी गाडीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. पावसाळा सुरु होण्याअगोदर महामार्ग प्रशासनाने याची योग्य दखल घेऊन लवकरात लवकर सदर रस्ता सुस्थितीत करावा.
पल्लवी गायकवाड (गृहिणी, लोणी काळभोर)