लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाची पहिल्याच पावसात दाणादाण उडून रस्त्याची अक्षरशा: वाट लागली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा याच महामार्गावरून जाणार असल्याने प्रशासनाच्या वतीने एक महिन्यापूर्वीच रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, गुरुवारी (ता.25) पडलेल्या पहिल्याच पावसामुळे लोणी स्टेशन (ता. हवेली) चौकात महामार्गावर खड्ड्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे चालकांना जीव मुठीत धरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
हडपसर ते उरुळी कांचन यादरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून ठिकठिकाणी छोटे-मोठे खड्डे पडले आहेत. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या वाहनचालकांना आगोदरच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहेत. त्यातच आता रस्त्यावरील खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त झाले असून लहान-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावरील वाहतूक पाहता रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर जड वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्यावरील डांबर उखडून खड्डे निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे हे खड्डे बुजविण्याचे काम वेळोवेळी करण्यात येते, मात्र रस्ते पुन्हा नादुरुस्त होतात. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्यावर सतत खड्डे पडतात. तर या महामार्गावर सतत अपघात होत असल्याने, काही नागरिकांना अपंगत्व तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील नेमका कोणता खड्डा चुकवायचा, हेच वाहनचालकांना समजत नाही.
दरम्यान, रस्त्याची खूपच दयनीय अवस्था झाली आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करूनही एका महिन्यातच रस्ता खराब होतो म्हणजे काम किती निकृष्ट होत असेल, याची प्रचिती येते. या रस्त्यावरून प्रवास करताना दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अपघाताचा नेहमी धोका असतो. त्यामुळे प्रवासी वाहने, चारचाकी, दुचाकी व इतर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष
एका महिन्याच्या आतच महामार्गावर मोठ-मोठे खड्डे पडत असतील, तर हे काम किती दर्जाचे झाले? हे आपल्याला दिसून येते. तसेच एनएचआय संबंधित ठेकेदारावर कारवाई का करीत नाही? असा सवाल उपस्थित करत एनएचआयने सदर कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे…
गेल्या काही महिन्यांपासून महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेले मोठ-मोठे खड्डे पाहून या रस्त्यावरुन प्रवास करताना खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सोयीस्करपणे डोळेझाक केल्याने वाहनधारकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
खड्डे त्वरित बुजवावे
पुणे-सोलापूर महामार्ग व सेवा रस्त्यांची अवस्था गावखेड्यांच्या रस्त्यांपेक्षाही वाईट आहे. असे निकृष्ट व सदोष काम केलेले असताना महामार्ग प्राधिकरण विभागाकडे कंत्राटदाराने केलेल्या कामाबाबत, त्यावरील खर्चाबाबत तसेच देखभाल- दुरुस्तीसाठी नेमलेले कामगार कुशल आहेत की नाही? याबाबत माहिती नसावी, अशी शंका नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच अनेकदा महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत तक्रारी, वृत्त प्रकाशित करुनही महामार्ग प्राधिकरण याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पुणे-सोलापूर रस्त्याच्या दुरावस्थे बाबत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे भरण्याबाबत कंपनीला सूचना दिल्या आहेत. सध्या पाऊस असल्याने डांबराने खड्डे भरता येत नाहीत. पाऊस उघडला की लवकरच खड्डे भरण्यात येतील. तसेच सेवा रस्त्यावर साचलेल्या पाण्याबाबत लवकरच उपयोजना करण्यात येतील.
पंकज प्रसाद (सहाय्यक कार्यकारी अभियंता -भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे)