अमोल दरेकर
सणसवाडी: शिरूर तालुक्यातील औद्योगिकनगरी म्हणून ओळख असणाऱ्या सणसवाडी परिसरातील एल अँड टी फाटा ते कारंदी फाटा हा रस्ता ‘पीएमआरडी’च्या माध्यमातून बनवण्यात आला होता. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने येथून प्रवास करणाऱ्या कामगार, शेतकरी, मालवाहतूकदार आणि प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
एकीकडे राज्यातील कारखाने वाहतूक कोडींमुळे आपल्या आस्थापना दुसरीकडे स्थलांतरी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या रस्त्याची दुरावस्था झाल्याने माल वाहतूक करणारे व्यावसायिक या कारणाने त्रस्त झाले आहेत. प्रशासन मात्र याकडे न पाहता डोळे झाकून बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या रस्त्याच्या दुर्देशेमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे येथील व्यावसायिक, कामगार, शेतमाल घेऊन जाणारे शेतकरी, विद्यार्थी, कारखानदार मेटकुटीला आले आहेत.
लोकसभेची निवडणूक संपल्याने आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे स्थानिक प्रतिनिधींनी या समस्यांकडे लक्ष देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्वरित लक्ष द्यावे आणि समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात येत आहे.