राहुलकुमार अवचट
यवत : दौंड विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीतुन नावे कमी करण्याची कोणतेही प्रक्रिया न अवलंबिता ३१००० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. याबाबतची चौकशी करावी तोपर्यंत दौंड विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीला स्थगिती द्यावी, अशी मागणी अखंड मराठा समाजाच्या वतीने प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात अली आहे.
दौंड विधानसभा मतदार संघाच्या मे २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकुण मतदार संख्या २९५४११ होती. परंतु पाचच महिन्यात ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील मतदार संख्या १३,७५७ मतांनी वाढून ३०९१६८ एवढी झाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मे २०२४ लोकसभा निवडणुकी पर्यंत २६ हजार ५०० नव्याने मतदारांची नोंदणी झाल्याने मतदारांची संख्या ३ लाख ३५ हजार ५०० होण्या ऐवजी मे २०२४ च्या लोकसभेला ३०४३२१ जाहली आहे.
या दोन्हीमध्ये जवळपास ३१ हजार मतदारांची संख्या कमी झाली असून विधानसभा निवडणुक २०१९ मध्ये असलेल्या मतदार संख्येपेक्षाही लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये पाच वर्षात वाढ होण्याऐवजी जवळपास ५००० मतांची घट झाली आहे. वास्तविक महाराष्ट्रातील २८८ मतदार संघापैकी २८७ मतदार संघामध्ये विधानसभा निवडणुक २०१९ मध्ये असलेल्या एकुण मतदार संख्येत मे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या मतदार यादीत वाढ झाली.
महाराष्ट्रातील एकमेव दौंड विधानसभा मतदार संघ असा आहे की, मतदार संख्येत वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. नोव्हेंबर २०१९ ते एप्रिल २०२४ या कालावधीत जवळपास ३१००० मतदारांची नावे यादीतुन वगळलेली असून या वगळलेल्या मतदारांपैकी जवळपास ५० टक्के नागरिक मतदार संघात असुनही लोकसभा निवडणुकीत त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.
निवडणुक अधिकारी यांनी नावे कमी करण्यासाठी आवश्यक कोणत्याही प्रकारची पद्धत न अवलंबिता परस्पर नावे कमी केल्याने मतदानाच्या हक्कापासुन वंचित राहावे लागले. यामुळे विधानसभा निवडणुक २०२४ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यापुर्वी याबाबत तातडीने चौकशी करून ज्या मतदारांची नावे मे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीतुन वगळण्यात आलेली आहेत. त्यांची नावे विधानसभा निवडणुक २०२४ साठी ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीमध्ये पुन्हा समाविष्ट करावीत.
तसेच ज्यांची नावे वगळायची आहेत त्यांची नावे कायदेशीर प्रक्रिया प्रमाणे वगळण्यात यावी. सदर प्रक्रिया विधानसभा निवडणुक २०२४ चा कार्यक्रम जाहीर होण्यापुर्वी पुर्ण होऊ न शकल्यास संपुर्ण कायदेशीर प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत दौंड विधानसभा मतदार संघाची २०२४ ची निवडणुक प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात यावी, अशी मागणी नायब तहसीलदार तुषार बोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अखंड मराठा समाज दौंड तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.