वाघोली : येथील पोस्टमन नामदेव गवळी हे आपली नोकरी सांभाळून सतत समाजसेवा करत असतात. तळागाळातील लोकांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा, यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांना गडभ्रमंतीची अफाट आवड आहे. दर रविवारी ते कुठल्यातरी अपरिचित किल्ल्यावर जातात.
फोपसंडी ता.अकोले जि.अहमदनगर येथे ट्रेकिंगसाठी गेले असता त्यांना दत्तात्रय मुठे या गावक-याकडून होतकरू विद्यार्थी गोरख मुठेबद्दल समजले. गोरख जन्मत:च अंध असून त्याची घरची परिस्थिती बेताची आहे. त्यात दुर्गम आदिवासी भागात राहत असल्याने सोईसुविधांचा अभाव आहे. त्याला उच्चशिक्षणासाठी लॅपटॉपची आवश्यकता असल्याचे दत्तात्रय मुठे यांनी सांगितले. अंध गोरख मुठेची परिस्थिती नसताना देखील तो हिरीरीने व जिद्दीने शिक्षण पूर्ण करतोय हे पाहून पोस्टमन गवळींना त्याचे कमालीचे कौतुक वाटले. त्यांनी दोन-तीन दिवसात आपल्या मित्रपरिवाराला आवाहन करुन रक्कम जुळवली आणि होतकरु अंध विद्यार्थी गोरख मुठेसाठी नवीन लॅपटॉप खरेदी केला.
पोस्टमन नामदेव गवळी हे कुंजरगडाच्या सफरीवर गेले असता गावक-यांच्या उपस्थितीत गोरख मुठेला लॅपटॉप सुपूर्द करण्यात आला. ” आपली शिक्षणाची गरज ओळखून, सुमारे दिडशे किमी अंतरावरून येऊन लॅपटॉप आणून दिल्याबद्दल गोरख मुठेने पोस्टमन गवळी व मित्रपरिवाराचे आभार मानले.