गणेश सुळ
वाघोली : केसनंद येथील निर्मल वसतिगृहातील ३० हून अधिक चिमुकल्यांच्या भविष्यासाठी बचत म्हणून व सिंगल पेरेंट मुलींना बचतीची सवय लागावी यासाठी वाघोलीतील पोस्टमन नामदेव गवळी यांनी सर्व मुलींना स्वखर्चातून पोस्टाचे आरडी बचत खाते उघडून दिले. या योजनेच्या पासबुकचे वितरण नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.
पोस्टमन नामदेव गवळी हे पोस्टाच्या लाभदायक योजना जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. पोस्टमन गवळी हे दरवर्षी शेकडो मुलांना स्वखर्चाने व लोकवर्गणीतून वर्षभर पुरेल एवढे शैक्षणिक साहित्य पुरवत असतात. समाजातील दीन-दुबळ्यांना शक्य तेवढी मदत करणारे गवळी हे खरेखुरे समाजसेवक आहेत.
शिवरायांच्या विचाराने प्रेरीत होऊन गवळी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. ते उत्तम लेखक आहेत. त्यांना गडकोटांची प्रचंड आवड आहे. या कार्यक्रमासाठी पोस्टमास्तर जमीर इनामदार, पांडुरंग आनंदे तसेच सूर्यकांत गुलदेवकर उपस्थित होते.