पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणात चाचणीसाठी पाठविलेले रक्ताचे नमुने अल्पवयीन आरोपीचे नसल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले आहे. त्यानंतर, रक्ताचे नमुने ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी बदलल्याचा आरोप झाला. आता हे बदललेले रक्ताचे नमुने कोणाचे आहेत, याविषयी डॉ. पल्लवी सापळे यांनी बनवलेल्या अहवालातून माहिती समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीऐवजी ससून रुग्णालयात त्याच्या आईचे ब्लड सॅम्पल घेतलं असल्याची माहिती आता अधिकृतरित्या उघडकीस आली आहे.
या अपघात प्रकरणात डॉ. पल्लवी सापळे यांनी बनवलेल्या अहवालात, अल्पवयीन आरोपीऐवजी ससून रुग्णालयात त्याच्या आईचे ब्लड सॅम्पल घेतले असल्याची माहित समजली आहे. ससून हॉस्पिटलचे डॉ. श्रीहरी हारनोळ यांनी एकूण तीन जणांचे ब्लड सॅम्पल घेतले आहे. अल्पवयीन आरोपीची आई आणि बिल्डर विशाल अगरवालची पत्नी शिवानी अगरवाल हिच्यासह दोन वृद्धांचे ब्लड सॅम्पल घेण्यात आले आहे. ब्लड सॅम्पल फेरफार करुन अल्पवयीन आरोपीच्या नावाखाली चाचणीसाठी पाठवल्याचा आरोप होत आहे.
पुणे हिट अँड रन प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून ब्लड सॅम्पल बदलल्याच्या बाबतीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यानंतर हे ब्लड नेमंक कोणाचं होतं, यासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. हे रक्त कोणाचे होते हे समोर आले नव्हते. मात्र, डॉ. पल्लवी सापळे यांच्या समितीने ससूनमधील चौकशीचा अहवाल बनवला आहे, यातून अनेक महत्त्वाच्या बाबीर समोर आलेल्या दिसून येत आहे.
अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याच्या उद्देशाने ससूनचे डॉ. श्रीहरी हरनोळ यांनी एकूण तीन जणांचे ब्लड सॅम्पल घेतल्याची बाब समोर आलेली आहे. यामध्ये एका महिलेचे रक्त होते तर दुसरे दोन वृद्ध व्यक्तीचे आहे, असं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. त्यामुळे हे महिलेचे रक्त अल्पवयीन आरोपीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. याच महिलेचे रक्त पुढे तपासणीसाठी देण्यात आलं होतं. त्यामुळे अल्पवयीन आरोपीच्या वडीलांच्या रक्तासोबत मॅच झालं नाही. त्याचा डीएनए जुळला नाही. त्यानंतर आरोपीचे रक्त घेण्यात आले आणि ते त्याच्या वडीलांसोबत मॅच झाले आहे. त्यामुळे हा प्रकार समोर आल्याने यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे.