पुणे : अस्सल मराठमोठ्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा असल्यास पुणेकरांची पहिली पसंती असते ती सरपोतदारांच्या लक्ष्मी रस्त्यावरील ‘पूना गेस्ट हाऊस’ला. गेल्या नऊ दशकांपासून केवळ पुणेकरांनाच नव्हे, तर उतारवयातील कलाकारांनाही आपुलकीची सेवा देणारे, कलाकारांचे आश्रयस्थान असलेले ‘पूना गेस्ट हाऊस’ आता चक्क टपाल तिकिटावर झळकणार आहे.
टपाल विभागातर्फे बालगंधर्व कलादालनात भरविण्यात आलेल्या ‘पुणे पेक्स’ प्रदर्शनामध्ये पूना गेस्ट हाऊसचे छायाचित्र असलेल्या टपाल पाकिटाचे अनावरण गुरुवारी करण्यात आले. मूकपटाचे निर्माते नानासाहेब सरपोतदार यांनी १९३५ मध्ये स्थापन केलेल्या पूना गेस्ट हाऊसच्या माध्यमातून सरपोतदार कुटुंबाची चौथी पिढी कार्यरत आहे. याशिवाय असा बहुमान प्रथमच आदरातिथ्य क्षेत्रातील संस्थेला मिळाल्यामुळे ‘पूना गेस्ट हाऊस’चे विशेष अभिनंदन होत आहे.
या विशेष कार्यक्रमाला पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार, अभय सरपोतदार, साधना सरपोतदार आणि शर्मिला सरपोतदार उपस्थित होत्या. टपाल विभागाच्या उपक्रमाचे कृतज्ञतापूर्वक कौतुक करून किशोर सरपोतदार म्हणाले की, या कामी इंटरनॅशल कलेक्टर ऑफ रेअर सोसायटीचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. पूना गेस्ट हाऊसचे छायाचित्र टपाल पाकिटावर प्रसिद्ध केल्यामुळे आमची ओळख देशाच्या कानाकोपऱ्यात होणार आहे.गेल्या नऊ दशकांच्या प्रामाणिक कार्याचा हा सत्कार आहे.