पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल 18 जानेवारीला जाहीर करण्यात आला आणि राज्यभरात यशाचा एकच धुरळा उडाला. या परीक्षेत विनायक नंदकुमार पाटील या तरुणाने बाजी मारली आहे. विनायक हा राज्यात पहिला तर, धनंजय वसंत बांगर हा दुसरा आला आहे. तर, मुलींमध्ये पूजा वंजारी प्रथम आणि प्राजक्ता पाटील ही दुसरी आली आहे.
असं म्हणतात की, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असतेचं. त्याचप्रमाणे अनेक पुरुष आपल्या आईच्या, बहिणीच्या, बायकोच्या आणि मुलीच्या मागे ठामपणे उभे राहतात. त्यांना यश मिळावं यासाठी आतोनात प्रयत्न करत असतात. पूजा वंजारी यांनीदेखील आपल्या यशाचं श्रेय नवऱ्याला आणि कुटुंबियांना दिलं आहे.
पूजा वंजारी या मूळ सांगलीच्या आहेत. आणि त्यांचं सासर पुणे आहे. त्या शेतकरी कुटुंबातून असल्या तरी त्यांच्या घराला शैक्षणिक पार्श्वभूमी होती. आपण अधिकारी होऊ शकतो असा विश्वास त्यांना आधीपासूनच होता. आता एमपीएससी उत्तीर्ण होऊन त्यांनी तो खराही करून दाखवला. ही परीक्षा सातवेळा दिल्यानंतर आठव्या वेळी त्यांनी यशाला गवसणी घातली, मात्र त्या खचल्या नाहीत. माघार घेण्याचा विचारही त्यांनी कधी केला नाही.
पूजा यांनी सांगितलं की, मी वेळ मिळेल तसा अभ्यास करायचे. हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. आम्ही सर्वजण खूप आनंदात आहोत. अनेक वर्षांच्या कष्टाचं चीज झालं आहे. माझे वडील शेती करतात तशीच माहेरी शैक्षणिक पार्श्वभूमीही आहे. २०१५ मध्ये ठरवलं होतं की आपण MPSC द्यायची. मी अधिकारी होऊ शकते असा मला विश्वास होता. मी प्रयत्न सुरू ठेवले. सासरी नवरा, सासूबाई आणि जाऊबाईंनी मला अभ्यासासाठी मदत केली. मी दररोज ८ तास अभ्यास करायचे, असं पूजा वंजारी यांनी सांगितलं.