पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुळशी तालुक्यातील दडवली गावातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याच्या प्रकरणात सह आरोपी असलेले दिलीप खेडकर यांना पुणे सत्र न्यायालयाकडून जमीन मंजूर करण्यात आला आहे. खेडकर यांना ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजित मरे यांनी २५ जुलै पर्यंत अटी शर्तीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, दडवली गावातील शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना पौड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने मनोरमा यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिलीप खेडकर यांनाही अटक होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे अटक टाळण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले होते.
त्यांनी ऍड सुधीर शहा यांच्यामार्फत पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्या अर्जावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. वकील शहा यांनी खेडकर यांच्या वतीने युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दिलीप खेडकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
पूजा खेडकर यांचे वडील निवृत्त प्रशासकीय अधिकारी असून निवृत्त झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून २०२४ ची अहमदनगरची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्याआधी ते भाजपमध्ये सक्रीय होते. खेडकर यांचे बंधू माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे तालुकाध्यक्ष राहिले आहेत.