पुणे : आयएएस प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांचे एक, दोन नाहीतर अनेक कारनामे उजेडात आले आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या कुटुंबीयांचे देखील कारनामे, अरेरावी यासंदर्भातील अनेक प्रकार समोर आले आहेत. अशातच आता पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केल्याची माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे.
तसेच, खेडकर कुटुंबीयांनी मुळशीमध्येही अरेरावी आणि दमदाटी करुन जमीन खरेदी केल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांचे बारामती आणि मुळशी कनेक्शन उघड झालं आहे.
वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याचे ट्वीट विजय कुंभार यांनी केलं आहे. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 8 मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर 14 गुंठे जमीन आहे. ही जमीन त्यांनी 2010 ते 2011 च्या दरम्यान खरेदी केली असल्याचं कुंभार यांनी सांगितले. दिलीप खेडकर यांची बारामतीतील वाघळवाडी येथे जमीन असल्याने खेडकर कुटुंबीयांचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे.
मुळशीतली जमिनही बळकावली
पुजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सरकारी नोकरी करताना कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे. त्या संपत्तीतून त्यांनी अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्या आहेत. मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी ही जमिन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमीनीवर देखील अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे.
या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करण्याच्या प्रकाराला विरोध केला, तेव्हा पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाऊन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहचल्या आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकी दिली. दरम्यान, या शेतकऱ्यांनी याबाबत पौड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची तक्रारही घेण्यात आली नाही.