पुणे : प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर हिची प्रशासकीय सेवेतील उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. या अनुषंगाने बाजू मांडण्याची संधी खेडकर हिला देण्यात आली आहे. त्याकरिता हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तणुकीबाबत राज्य शासनाला अहवाल पाठविल्यानंतर खेडकर हिचे पुणे जिल्ह्यातून प्रशिक्षण रद्द करून वाशिम जिल्ह्यात उर्वरित प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. त्यानंतर खेडकर हिचे प्रशिक्षण स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर जुलै महिन्यात खेडकर हिची उमेदवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) रद्द केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने वैयक्तिक सुनावणीसाठी खेडकर हिला पाचारण केले आहे. त्याकरिता नोटीस बजावण्यात आली आहे.
खेडकर हिला १४ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे कळविण्यात आले होते. मात्र, पूजा हजर राहिली नाही. त्यामुळे पुन्हा सुनावणीसाठी हजर राहण्याबाबत कळविले आहे. सुनावणीसाठी हजर न राहिल्यास तुम्हाला तुमची बाजू मांडायची नाही, असे समजले जाईल, असेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार या नोटीसची प्रत तहसीलदारांकडून खेडकरच्या स्थानिक पत्त्यावर जाऊन दारावर लावली असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.