पुणे : पूजा खेडकर प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने पूजा यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे.
पूजा खेडकर यांनी सिव्हील परीक्षा 2022 – 2023 दरम्यान सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र खोटं असल्याचं पोलिसांनी या अहवालात म्हंटलं आहे. प्रमाणपत्रात पूजा खेडकर यांनी नाव बदललं असून पूजा यांच्या सांगण्यानुसार हे प्रमाणपत्र महाराष्ट्राने दिलेले नाही असे दिल्ली क्राइम ब्रांचने उच्च न्यायालयात दिलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे.
पूजा खेडकरने या दिव्यांग प्रमाणपत्रांचा वापर करुन युपीएससीच्या निवडीत विशेष सवलत मिळवली होती. कमी गुण मिळाल्यानंतरही तिला दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सूट मिळाल्याने उत्तीर्ण होता आलं होतं. तिने 841 रॅंक मिळवली होती. आता दिल्ली पोलीसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने तिची प्रमाणपत्रे खोटी असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला 5 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. 29 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या सुनावणीत पुजाने मी युपीएससीला कोणतीही खोटी माहिती दिली नसल्याचा दावा केला होता. मात्र, आता तिचे अपंगत्व प्रमाणपत्र खोटे असल्याची माहिती पुढे आली आहे.