केडगाव : दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुऱ्हाळघरांचा व्यवसाय जोरात सुरू असून, या गुऱ्हाळघरांमध्ये जाळण्यासाठी प्लास्टिक, रबर, टायर, चमडे, चपला असे प्रदूषण करणाऱ्या वस्तू सर्रासपणे वापरण्यात येत आहेत. मात्र, यापासून परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होऊन परिसरातील नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत असल्याची वस्तूस्थिती आहे.
तसेच शेतामधील तरकारी पिकांवर याचा मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम पाहावयास मिळत आहे. गुऱ्हाळाच्या जवळील घरावर काळे थर जमा होत आहेत. तसे पाहता गुऱ्हाळघरे ही पूर्वीपासूनच चालू आहेत. पण त्यावेळी शेतकरी स्वतः गुऱ्हाळ व्यवसाय करत होते व जळण्यासाठी ऊसाच्या चोतऱ्या वापरण्यात येत होत्या. त्यामुळे धुराचे प्रदूषण ही कमी प्रमाणात होत होते.
याशिवाय, गूळ बनवण्यासाठी भेंडी वापरण्यात येत होती. त्यामुळे गूळही चांगला होता आणि प्रदूषणही कमी होत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गावागावात मोठ्या प्रमाणावर गुऱ्हाळांची संख्या वाढली आणि यावर परप्रांतीय व्यावसायिकांचा कब्जा वाढला आहे. हे परप्रांतीय लोक कशाचीही परवा न करता गुऱ्हाळावर सर्रासपणे प्लास्टिक, रबर, टायर, चपला इत्यादी वस्तू जाळण्यासाठी वापरत असून, गुऱ्हाळ परिसरात या वस्तूंचे मोठमोठे ढिग लागलेले दिसून येत आहे. तसेच बाहेरून अशा विषारी जळणाऱ्या वस्तू ट्रकच्या ट्रक मागून घेतल्या जात आहेत.
गुऱ्हाळ व्यवसाय हे आता मोठ्या प्रमाणावर लोकवस्तीत वाढले असून, गुऱ्हाळांच्या धुरड्याही कमी उंचीच्या आहेत. त्यामुळे त्यातून निघणारा धूर हा वरच्या हवेत न जाता तो खालच्या हवेतच थांबून लोकवस्तीत पसरतो. त्यामुळे त्याचा जास्त धोका वाढत चालला आहे.
धुरामुळे नागरिकांसह प्राण्यांवरही होतोय परिणाम
या गुऱ्हाळामधून निघणाऱ्या काळ्याकुट्ट धुरामुळे मानवासह पक्षी प्राणी व वनस्पती यांच्यावर देखील परिणाम होताना दिसत आहे. सध्याच्या काळातील प्रदूषणाची वाढते परिस्थिती ही चिंता वाढवणारी आहे. या प्रदूषण करणाऱ्या गुऱ्हाळावर कारवाई व्हावी, अशी मागणी गुऱ्हाळ परिसरातील नागरिक करत आहेत. जर धुराच्या प्रदूषणाचा प्रश्न सुटला नाही तर पुढील काळात नागरिकांना मोठ्या आजारांना सामोरे जावे लागणार असल्याची वस्तूस्थिती आहे.