विशाल कदम
पुणे : पुणे महापालिकेच्या हद्दीतील २७० विवाहगृहांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावून कारवाई केली. मात्र, हडपसर व पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विवाहसोहळा, सण-उत्सव, जयंती व विविध कार्यक्रमानिमित्त डीजे व फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या प्रमाणात ध्वनि प्रदूषण होत आहे. त्यामुळे हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन व जिल्ह्याच्या इतर ठिकाणीही कधी कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या पुणे शहरात विविध विकासकामे होत असली तरी लोकांच्या मानसिकतेत अपेक्षित बदल होत नसल्याचे दिसत आहे. कोणताही सण, उत्सव असो सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर मोठ्या आवाजात डीजे लावून ध्वनि प्रदूषण केले जात आहे. यादरम्यान वाहतूक कोंडी झाल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेकदा रस्त्यावर लावण्यात येणारे फटाके उडून नागरिकांच्या अंगावर पडल्याचे दिसून येते.
ध्वनि प्रदूषणामुळे नागरिकांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य यांवर परिणाम होतो. ध्वनि प्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयरोगाला आमंत्रण मिळते. ध्वनि प्रदूषणामुळे मानसिक संतुलन बिघडते. हळूहळू बहिरेपणा येतो. हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या ध्वनिवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनि प्रदूषणामुळे हानी पोहचू शकते. डीजेसमोरच धांगडधिंगा नाच केला जातो. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीनेही कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही नागरिकांकडून केली जाते.
पटवर्धन बाग येथील रहिवाशाने विविध मंगल कार्यालयांच्या परिसरात होणाऱ्या ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाची हानी संदर्भात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल केली होती. त्याचप्रमाणे म्हात्रे पुलाजवळील १०० फुटी डीपी रस्त्यावर असणाऱ्या मंगल कार्यालयांच्या प्रदूषणाविरुध्द सुजल सहकारी प्रकरणात, गृहरचना संस्था मर्यादित यांच्या वतीने सन २०१८ मध्ये ऍड. असीम सरोदे यांच्यामार्फत पुणे महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतरांविरुद्ध याचिका दाखल केली होती.
दरम्यान, आठ दिवसांपूर्वी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (पश्चिम झोन) पुणे महापालिकेकडे संपूर्ण शहरातील मंगल कार्यालयांची यादी मागितली होती. त्यानंतर महापालिकेकडून यादी मिळाली होती. नियमांनुसार मंगल कार्यालयांचे झोन तपासले. सायलेंट झोन किंवा कमर्शियल झोनमध्ये किती डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. याची तपासणी करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे महापालिकेच्या हद्दीतील २७० मंगल कार्यालयांना जल आणि वायू प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायद्याच्या तरतुदीनुसार दिलेल्या निकषाबाबत नोटिसा बजावल्या आहेत. सोमवारपासून मंगल कार्यालयांकडून मिळालेल्या नोटिशीच्या उत्तरांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. एक महिन्याच्या आत एनजीटीकडे कारवाईचा अहवाल सादर करावा लागणार आहे.
दणदणाटाला आता बसणार चाप
राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (पश्चिम झोन) खंडपीठाचे न्यायिक सदस्य आणि न्यायमूर्ती दिनेशकुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. विजय कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुणे महापालिकेच्या हद्दीतील २७० विवाहगृहांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता मंगल कार्यालये, बँक्वेट हॉलमध्ये समारंभानिमित्त होणाऱ्या दणदणाटाला आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईमुळे चाप बसणार आहे.
‘या’ परवानग्यांची असते आवश्यकता
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतेच मंगल कार्यालय, क्लब हाऊस, हॉटेल, मोटेल आणि रेस्टॉरंटसह विविध सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण नियंत्रित करण्याच्या उद्देशाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. वाढत्या प्रदूषणाचा आळा घालण्यासाठी कठोर नियम तयार करण्यात आले आहेत. हवा, पाणी आणि ध्वनिप्रदूषण, घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा आवश्यक असणार आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पवानगी घेणे आवश्यक असणार आहे. ध्वनी मर्यादेबाबत परवानगी अनिवार्य असणार आहे. तसेच भूजलाचा उपसा होत असेल तर संबंधित यंत्रणेकडूनही परवानगी घ्यावी लागणार आहे.