जुन्नर : लोकसभेच्या निवडणुकीत शिरुर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. शिरुरमध्ये आढळराव पाटील ऐन निवडणुकीच्या तोंडावर हातावर घड्याळ बांधत महायुतीकडून मैदानात उतरले. तर मविआचा उमेदवार अमोल केल्हे असल्याचे आधीच जाहीर झाले होते. दोन्ही उमेदवार तगडे असल्याने ही लढत प्रतिष्ठेची ठरणार आहे. प्रचारादरम्यान एकाच वेळी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांची शिवनेरीवर भेट झाली. दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन केले. या वेळी अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांना वाकून नमस्कार केला आणि आशीर्वादही घेतला. दोघांनीही शिरूर लोकसभेसाठी एकमेकांना शुभेच्छा दिल्याचे चित्र या वेळी पहायला मिळाले.
तिथीनुसार शिवजयंती आज साजरी होत आहे. या दरम्यान कोल्हे व आढळराव पाटील शिवनेरीवर एकत्र दिसले. पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली.
सकाळच्या सुमारास दोघेही शिवनेरी गडावर शिवरायांच्या चरणी लीन होण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. या वेळी रस्त्यात भेट झाली. आढळराव पाटील समोर येताच अमोल कोल्हेंनी थेट वाकून आढळराव पाटलांना नमस्कार केला. त्यानंतर दोघांमध्ये गप्पा झाल्या आणि हस्तांदोलन करुन दोघेही मार्गस्त झाले. या कृत्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाल्याची चर्चा परिसरात रंगली होती.
शिरुर मतदारसंघातून कडवी टक्कर पाहायला मिळणार आहे. त्याआधी ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. या वेळी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते. वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही आपली संस्कृती आहे, म्हणून आढळराव पाटील यांना नमस्कार केला. आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची ताकद द्या, हेच मागणे आज शिवनेरीवर नतमस्तक होताना मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.