Political News : जेजुरी, (पुणे) : पुण्याचा खरा विकास साधायचा असेल तर पुरंदर एअरपोर्टला पर्याय नाही. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता आपण विमानतळाचे काम मार्गी लावले पाहिजे. मी नागपूरमधूनच निवडणूक लढवणार आहे. मात्र, पुण्याच्या विकासासाठी पुरंदर एअरपोर्ट झाला पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. सगळ्यात मोठे एक्सपोर्ट मार्केट एअरपोर्टच्या माध्यमातून शेतीकरीता सुरु होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जे काही उपयोगाचे असेल ते सगळे करण्याचा प्रयत्न सरकार करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरवातीलाच फडणवीस यांनी तडफदार उपमुख्यमंत्री अजित पवार असा उल्लेख केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उत आला होता. अजित पवार यांच्या सरकारमध्ये येण्यामुळे सरकारच्या कामाचा वेग कमालीचा वाढला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
पुणे जिल्ह्यातील जेजुरीत अर्थात पवारांच्या बालेकिल्यात आज शासन आपल्या दारी हा महायुतीचा पहिलाच कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी फडणवीस बोलत होते. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी शिंदे-फडणवीस आणि पवार या तिघांनी जेजुरी गडावर जाऊन खंडोबाचे दर्शन घेतले.
दरम्यान, यापूर्वी दोन वेळा जेजुरीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, काही कारणास्तव तो रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आज होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी चोख करण्यात आली होती. या कार्यक्रमप्रसंगी पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी दालने देखील उभारण्यात आली होती.
या कार्यक्रमात बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, अजित पवार यांच्या सरकारमध्ये येण्यामुळे सरकारच्या कामाचा वेग कमालीचा वाढला आहे. लवकरच लोकांना कार्ड मिळणार आहेत. ती घेऊन दवाखान्यात गेले की उपचाराचा खर्च एक रुपया देखील येणार नाही. लोकाभिमुख कामे सध्या जलदगतीने होत आहेत. सरकारने महिलांसाठी मोठी योजना आणली आहे. त्यामुळे प्रत्येक घरातील महिलांना अर्ध्या तिकीटांमध्ये प्रवास करता येत आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यासोबतच मुलगी जन्माला येणारं घर लखपती झालं पाहिजे यासाठी मुलगी जन्माला आली की ५ हजार रुपये, सातवीत गेली की ८ हजार रुपये आणि १८ वर्षांची झाली की ७५ हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यातील रस्ते, रेल्वे स्थानकांची कामे सुरु आहेत. पुण्यातील रिंग रोडचेदेखील काम सुरु करण्यात येणार आहे. त्यासोबतच सिंचनाच्या सोयीकरीता ज्या योजना पुढे य़ेतील त्यासाठी सरकार मदत करणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचडवडसह राज्यातील मोठ्या महापालिकांचे सांडपाणी प्रक्रिया करुन उद्योगाला देण्याचा विचार सुरु आहे. असे केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होणार आहे. बचत झालेले पाणी पुण्यात सिंचनाकरीता देणे शक्य असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आम्हाला जेजुरीला यायला वेळ लागला कारण पुणे एअरपोर्टवर एअरफोर्सची प्रात्यक्षिके सुरु होती. पुण्याचा एअरपोर्ट हा लष्कराचा एअरपोर्ट आहे. आता पुरंदरचे एअरपोर्ट उभारण्याची मागणी होत आहे, तर काहीजण याला विरोध करत आहेत. पण मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या साक्षीने सांगतो की, हे महायुतीचे सरकार आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. प्रत्येकाला योग्य मोबदला दिला जाईल.
लोकांच्या हितासाठी, त्यांची कामे व्हावीत यासाठी आम्ही महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगत अजित पवार म्हणाले की, अमित शहांनी देशभरातील साखर कारखान्यांची पंधराशे कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. २२ वर्षांत हे पहिल्यांदाच झालं आहे. मी याआधी अनेक केंद्रीय अर्थमंत्र्यांना भेटलो. पण निर्णय शहांनी घेतला. आता केंद्र सरकारने शेतकऱ्याला भरावा लागणारा उसावरचा इन्कम टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायद होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत विकास करतोय आणि शाहू- फुले आणि आंबेडकरांचा आणि शिवछत्रपतींचा महाराष्ट्र देखील प्रगती करतोय. विरोधी पक्षात राहून लोकांची कामे मार्गी लावता येत नाहीत. यामुळेच मी हा निर्णय घेतला. विरोधक टिका करतात, पण राज्याचे हित कशात आहे हे पहा ना, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी मिळावा, यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवण्यात येतो. विद्यमान राज्य सरकारकडून राज्यातील अनेक शहरांत यापूर्वी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमानिमित्त कार्यक्रम घेतले गेले आहेत. दरम्यान, सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच हा मोठा कार्यक्रम पवारांच्या बालेकिल्ल्यात झाला आहे. यापूर्वी विविध कारणांमुळे चार वेळा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
हातातील काठी, घालू का पाठी? दादांच्या अॅक्शनची चर्चा…
एकनाथ शिदेंसोबत असलेले विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा धनगरी घोंगडी, पगडी आणि काठी देऊन सत्कार केला. अजित पवारांचा सत्कार केल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढण्याची शिवतारे यांची इच्छा होती. या वेळी अजित पवारांनी गमतीने हातातील काठी पाठीत घालू का? अशी अॅक्शन केली. यापूर्वीच्या निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा जाहीर दावा करुन पराभव घडवून आणला होता. या मतदारसंघातून कॉंग्रेसचे संजय जगताप विजयी झाले होते, या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या या अॅक्शनची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, विजय शिवतारे यांनी सत्कार केल्यानंतर संजय जगताप यांनीही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा सत्कार केला.