पुणे: गेल्या दोन दिवसांपासून वातावरणातील थंडी वाढल्याने ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे. या शेकोटीजवळ घरातील आबालवृद्धांसह लहान मुले तसेच शेजारील मित्रमंडळीही जमू लागल्याने गप्पांचे फड रंगू लागले आहेत. दोन दिवसांपासून संध्याकाळपासून कडक थंडी जाणवू लागली आहे. यामुळे ग्रामीण भागातील गावांमध्ये रोज रात्री अनेक ठिकाणी आपल्या अंगणात शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
या शेकोटीसाठी लागणारी लाकडे घरातच मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने या शेकोट्यांचा अग्नी सतत धगधगत असतो. संध्याकाळी शेकोट्या पेटल्यानंतर घरातील आबालवृद्ध, लहान मुले, तसेच शेजारील राहणारे, आपले मित्र, नातेवाईक यांना शेकोटीजवळ बोलावले जाते. यामुळे नात्यांतील एकता अधिक जवळ येत असल्याने या शेकोटीजवळ थंडी दूर करण्याबरोबरच आत्मियता निर्माण होत असल्याने विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.
जुन्नर तालुक्यात गुलाबी थंडीचा कडाका वाढला असून, यात विधानसभा निवडणुकीच्या राजकीय गप्पा ओघाने चांगल्याच रंगत आहेत. त्यामुळे वातावरण गरम होत असल्याचे दिसून येते. निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने कोणता उमेदवार निवडून द्यायचा याबाबत नेतानिहाय, पक्षनिहाय विचारमंथन करताना दिसून येत आहेत. थंडीपासून बचावासाठी पेटवलेल्या शेकोट्यांभोवताली या गप्पा जोरदार रंगत आहेत.
अनेक भिन्नभिन्न नेत्यांचे व पक्षाचे समर्थक एकाच ठिकाणी जमत असल्याने तात्विक खटके उडत मुद्यावरून सुरू झालेली चर्चा गुद्यावर येते की काय? अशी स्थिती निर्माण होत आहे. मात्र, वेळीच समंजस कार्यकर्त्याच्या मध्यस्थीने वाद निवळत असल्याचे सांगण्यात येते.