पुणे: आगामी निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रखडलेल्या राज्यपाल नामनिर्देशीत 12 आमदारांच्या नियुक्तीला मुहूर्त लागण्याची चिन्ह दिसत आहेत. आज (दि. ४) होणाऱ्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव येऊन तो मंजूर होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्याला कारणही तसेच आहे. गुरुवारी बारामतीत बोलताना विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा दिले. त्यातच राज्यपाल नामनिर्देशीत 12 आमदारांची यादी आज कॅबिनेटमध्ये येणार असल्याची बातमी आली. त्यानंतरच अजित पवार हे विधान परिषदेवर जाणार, अशी चर्चा सुरु झाली.
दरम्यान गुरुवारी बारामतीत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा दिले. मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा, असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले. अजित पवार यांनी आपला मानस व्यक्त करताच, कार्यकर्त्यांनी त्याला विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. त्यानंतर अजित पवार यांनी ‘वेट अँड वॉच’ सांगत संदिग्धतेचा धुरळा उडवून दिला.
यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपुत्र जय पवार बारामतीतून विधानसभा लढणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यानंतर या चर्चा मागे पडल्या आणि अजितदादाच हेच उमेदवार असल्याचं बोललं जाऊ लागलं. मात्र, गुरुवारी पुन्हा एकदा खुद्द अजित पवारांनीच यासंबंधी संकेत दिले. त्यानंतर पवार हे आमदार रोहित पवारांविरोधात कर्जत- जामखेडमधून निवडणूक लढणार, अशीही चर्चा होती. कालांतराने तीही मागे पडली. त्यामुळे आता अजित दादा कुठून उभे राहणार, हा प्रश्न समर्थकांच्या मनात आ वासून उभा राहिला आहे. अशातच राज्यपाल नामनिर्देशीत आमदारांबाबत निर्णय होणार असल्याची बातमी आली. त्यानंतर अजित पवार विधानपरिषदेवर जाणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. त्यामुळे आगामी काळात खरंच अजित दादा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत विधानपरिषदेवर जाणार का? ते स्पष्ट होणार आहे.
.