पुणे : हुंडा घेणे हा कायद्याने गुन्हा असताना देखील आजही सर्रास हुंडा घेतला जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. केवळ सामान्य माणूसच नव्हे तर पोलीस कर्मचारी देखील हुंडा घेतात आणि हुंडा न दिल्यास पत्नीला मारहाण देखील करतात. अशाच एका पोलीस कर्मचाऱ्याने लग्नामध्ये ठरलेल्या ५ लाख रुपये हुंड्यापैकी एक लाख रुपये कमी दिल्याच्या कारणावरून पत्नीला वर्दीच्या बेल्टने बेदम मारहाण केली. या प्रकरणी अमरावती येथील राज्य राखीव पोलीस बल क्र.९ दलातील पोलीस कॉन्स्टेबल विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी घडला.
याबाबत विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या पीडित २८ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी (ता. २५) फिर्याद दिली आहे. यावरुन सचिन राजकुमार खंडारे (वय-२९, रा. रुपचंदनगर, वाशीम बायपास, ता. अकोला) याच्यावर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत फिर्यादी यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन खंडारे हे अमरावती येथे राज्य राखीव पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सचिन खंडारे यांनी लग्नात पाच लाख रुपये हुंड्याची मागणी केली होती. त्यापैकी चार लाख रुपये लग्नाच्यावेळी खंडारे यांना देण्यात आले होते. परंतु एक लाख रुपये देणे बाकी होते. यावरुन फिर्यादी व सचिन खंडारे यांच्यात वाद होत होते. या वादातून आरोपीने त्याच्या वर्दीच्या बेल्टने मारहाण केली. तसेच गळ्यातील मंगळसुत्र व इतर दागिने हिसकावून घेतले. तसेच जबरदस्तीने फारकतीच्या नोटरीवर सही करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड करीत आहेत.