पुणे : पुण्यात किरकोळ कारणावरून टोळक्याने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना विश्रांतवाडीतील धानोरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस कर्मचारी धवल रविकांत लोणकर (वय-३८, रा. भैरवनगर, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विजय सूर्यकांत केंजळे (वय-२८,) सूर्यकांत गणपतराव केंजळे (वय-५८), चंद्रकांत गणपतराव केंजळे (वय-५२), विशाल चंद्रकांत केंजळे (वय-२४), निमेश किशोर जगताप (वय-२१, सर्व रा. गुडविल संस्कृती सोसायटी, भैरवनगर, धानोरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणकर हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. लोणकर हे कुटुंबीयांसोबत मोटारीतून घरी जात होते. भैरवनगर भागातील गल्ली क्रमांक दहाच्या परिसरात एक जण अचानक मोटारीजवळ आल्याने लाेणकर यांनी मोटार थांबविली. आरोपी धवल लोणकर यांच्या मोटारीजवळ आला. माझ्या अंगावर मोटार का घातली ? अशी विचारणा करून त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
लोणकर हे मोटारीतून खाली उतरले. तेव्हा केंजळे, जगताप यांनी लोणकर यांना धक्काबुक्की केली. एका आरोपीने त्यांच्या चेहऱ्यावर वार केला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.