वेल्हे : वेल्हे येथे भरदिवसा झालेल्या खुनाचे गूढ उकलण्यात वेल्हे पोलिसांना यश आले असून जमिनीच्या वादातून हा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन महिलेसह ८ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे, (वय -५६ वर्षे, रा. पाबे, ता. वेल्हा, जि. पुणे, सध्या रा. काळभोरवाडा, शुक्रवार पेठ, पुणे), आकाश कुमार शेटे, (वय – २४) यश ऊर्फ प्रथमेश विनायक चित्ते, (वय – २२) अक्षय गणेश साळुंखे, वय-२७, शुभम राजेश थोरात, वय -२१ रा. सर्वजन शुक्रवार पेठ, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
तर नवनाथ उर्फ पप्पू नामदेव रेणुसे असे गोळ्या झाडून व धारदार हत्यारांनी वार करुन खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश नामदेव रेणुसे (वय – ४५ रा. पाबे ता. वेल्हे) यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास नवनाथ रेणुसे याचा माऊली रेणुसे व त्याचे अनोळखी ४ साथिदार यांनी मिळून नवनाथ रेणुसे हा मरळ आवाड या गावातील खरेदी केलेल्या जमीनीबाबत काहीतरी काड्या करीत आहे, असा समज करून घेऊन धारदार चाकुने व सत्तुराने चेहऱ्यावर वार करून तसेच पिस्टलमधून गोळया झाडून वेल्हे गावात विसावा हॉटेल येथे खुन केला होता. यामुळे या भागात खळबळ उडाली होती.
या घटनेचा पोलीस तपास करीत असताना एका खबऱ्याकडून पोलिसांना माहिती मिळाली की, खून हा माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे याने केला असून तो गुन्हयातील त्याचे साथिदारासह किरकटवाडी, ता. हवेली या ठिकाणी आला आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. खुनाबाबत अधिक चौकशी केली असता, त्यांनी खून केल्याचे मान्य केले.
माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे याचे जमीनीचे व्यवहारात मयत नवनाथ ऊर्फ पप्पु नामदेव रेणुसे हा हस्तक्षेप करीत आहे. या कारणावरून व माऊली रेणुसे याचा मुलगा एक वर्षापुर्वी मयत झालेला असून त्याचा मृत्यु होण्यास नवनाथ रेणुसे हाच जबाबदार आहे, असा समज करून गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली लक्ष्मण रेणुसे यांनी त्यांची पत्नी कुंदा ज्ञानेश्वर रेणुसे (वय ४५), मुलगी पल्लवी भुषण येणपुरे, (वय ३०), मुलगी गौरी अमोल ऊर्फ शशीकांत शिंदे, (वय २७) यांच्यासह मिळून गुन्हा करण्याचा कट तयार करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून तपास उप विभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील हे करीत आहेत.