पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या आवारात सुरू असलेल्या नाट्यप्रयोगादरम्यान रामायणाबाबत आक्षेपार्ह उल्लेख केल्यानंतर तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती बंदोबस्तावर असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्वरीत न कळविल्याने अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. सचिन शंकर गाडेकर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गाडेकर नियुक्तीस आहेत. ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी रामायणवर आधारित नाटक सादर केले. नाटकात विडंबनाच्या नावाखाली अश्लील शब्द वापरण्यात आले होते, असा आरोप करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटक बंद पाडले. त्यावेळी ललित कला केंद्राच्या आवारात मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
दरम्यान, शनिवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ललित कला केंद्राच्या आवरात घोषणाबाजी करून शाईफेक केली. कार्यकर्त्यांनी खिडकीच्या काचा फोडल्या तसेच कुंड्या फोडून नुकसान केले. त्यावेळी ललित कला केंद्रात पोलीस उपनिरीक्षक गाडेकर बंदोबस्तासाठी होते.
गाडेकर यांनी ही घटना घडल्यानंतर योग्य ती दखल घेतली नाही. तेथे शीघ्र कृती दलाला (रॅपिड ॲक्शन फोर्स) बोलाविले नाही, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त यांच्यासह नियंत्रण कक्षाला या घटनेची माहिती त्वरीत कळविली नाही. कर्तव्यात कसुरी केली.
या बेजबाबदारपणामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. पूर्व विभागाचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन गाडेकर यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले.