पुणे: मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या जाहिरातीतील बेपत्ता असलेल्या वरुडे (ता. शिरूर) गावातील ज्येष्ठ व्यक्तीचा तपास ग्रामीण पोलिसांनी जारी केला आहे. यासंदर्भात शिक्रापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे.
वरुडे गावातून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या ज्ञानेश्वर विष्णू तांबे या ज्येष्ठ नागरिकाचे छायाचित्र जाहिरातीत झळकल्याने खळबळ उडाली आहे. जाहिरातीत बेपत्ता व्यक्तीचे छायाचित्र वापरल्याने कुटुंबीयांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, समाजमाध्यमात प्रसारित केलेली जाहिरात अधिकृत नसल्याचा खुलासा महायुती सरकारने केला असून, संबंधित जाहिरात माहिती आणि जनसंपर्क कार्यालयातून प्रसारित करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
तांबे हे वरूडे गावातील तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झाले. तांबे कुटुंबीयांनी त्यांचा शक्य तितक्या सगळीकडे शोध घेतला. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. बेपत्ता असलेल्या आमच्या वडिलांची सरकारने भेट घडवून द्यावी, अशी विनंती ज्ञानेश्वर तांबे यांचा मुलगा भरत यांनी केली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरुडे गावाचा समावेश होतो. शिक्रापूर पोलिसांचे पथक शनिवारी (दि. २०) रात्री उशिरा वरुडे गावात दाखल झाले. त्यांनी तांबे कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती संकलित केली. वारी तसेच इतर तीर्थक्षेत्र दर्शनासाठी गेल्यानंतर डिसेंबर २०२१ पासून ते बेपत्ता झाले आहेत. त्यानंतर त्यांचे छायाचित्र थेट जाहिरातीत दिसून आले. जाहिरातीत तांबे यांचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर आता शिक्रापूर पोलिसांकडून तक्रार घेण्यात आली असून, त्याबाबत तपास करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.