Police Recruitment | दौंड : लहानपणी आई वडिलांचे छत्र हरपलेल्या अमर आण्णासो कनप (रा.मु पो. अग्रण धुळगाव,ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) जिद्द, चिकाटी, मेहनत, सराव आणि अभ्यासामध्ये दाखविलेल्या सातत्याच्या जोरावर पोलीस दलात भरारी घेत भरती झाला आहे. अतिशय नाजूक परिस्थितीवर मात करून अमरने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे पुण्यासह सांगली जिल्ह्यातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
अमरचे वडील हे आण्णासो कनप दुधगाव येथे मोलमजुरी करून कुटुंब चालवीत होते. तर आई सविता कनप या दोन मुले व एका मुलीची जबाबदारी पार पडत होती. संसाराचा गाडा सुरु असताना, अमर हा ६ वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचे आकस्मित निधन झाले होते. वडिलांच्या निधानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी आई सविता कनप यांच्यावर पडली.
हि जबाबदारी सांभाळत असताना अमरची आई सविता याचेही निधन झाले. आई वडिलांच्या निधनानंतर तिन्ही मुले पोरके झाली. त्यानंतर दोन लहानबहिण भावाची जबाबदारी मोठा भाऊ अजय कनप याच्यावर पडली. अजयने हि जबाबदारी सांभाळून शेतात मोलमजुरी करून लहान भावंडाचा सांभाळ केला.
अमरचे प्राथमिक शिक्षण दुधगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण केले. तर पुढील पदवी पर्यंतचे कवठेमहांकाळ येथील शिक्षण पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालयातून पूर्ण केले. घराची परिस्थिती हलाखीची असल्याने अमर शिक्षणाबरोबर भावाला शेतातील कामात मदत करू लागला.
पाटस (ता. दौंड) येथील “विघ्नहर्ता करियर अकॅडमी”त प्रवेश…
त्यानंतर दोन्ही भाऊ व आजोबांनी मिळून बहिणीचा विवाह केला. व आपले कर्त्यव्य पार पडले. मात्र अमरने पोलीस व्हायचं पाहिलेले स्वप्न त्याला झोपू देत नव्हते. मग अमरने पाटस (ता. दौंड) येथील “विघ्नहर्ता करियर अकॅडमी”त प्रवेश घेतला आणि सराव करण्यास सुरवात केली.
रायगड शहर पोलीस भरती २०२१ च्या पोलीस शिपायांच्या जागेच्या भरतीसाठी अमरने अर्ज केला होता. कोरोना काळामुळे ही पोलीस भरतीची परीक्षा लांबविली होती. या भरतीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात झाली. या परीक्षेत अमरने भरघोस गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. आई-वडिलांचे छत्र हरविल्यानंतरही भाऊ अजयने कुटुंबाची योग्य जबाबदारी स्वीकारून लहान भाऊ अमरला पोलीस बनविले. यामुळे अमर व त्याचा भाऊ अजयचे पुण्यासह सांगली जिल्ह्यातील नागरिकांकडून भरभरून कौतुक केले आहे.
दरम्यान, अमरला या यशासाठी मोठा भाऊ अजय यांने नेहमी प्रेरणा दिली आहे. तसेच या यशासाठी पाटस येथील विघ्नहर्ता करिअर अकॅडमीचे संचालक संतोष शिंदे व शंकर काळे यांचे वेळोवेळी सहकार्य व बहुमुल्य योग्य मार्गदर्शन मिळाले आहे.
याबाबत पुणे प्राईम न्यूजशी बोलताना अमर कनप म्हणाला की, माझ्या भावाने केलेल्या कष्टाचे मला फळ मिळाले आहे. त्यामुळे मिळालेले हे यश भावाच्या चरणी अर्पण करीत आहे. तसेच पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अपयश आले तर खचून जावू नये. जोपर्यंत यश मिळत नाही. तो पर्यंत प्रयत्न करीत राहावे. असे अमर कनप याने सांगितले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!